इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी पाक क्रिकेट संघातील १० खेळाडू करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्वत: ही माहिती दिली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात एकूण १० खेळाडूंपैकी ६ खेळाडूंचा करोना अहवाल अचानक निगेटिव्ह आला. त्यामुळे पाक क्रिकेट बोर्डावर टीका करण्यात आली होती. पण या साऱ्या दुर्लक्ष करत पाक क्रिकेट बोर्डाने २० खेळाडूंचा संघ इंग्लंडसाठी रवाना केला. क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बाब म्हणजे आता करोना चाचणीत निगेटिव्ह आढळलेले खेळाडूदेखील इंग्लंडला रवाना होणार आहेत.

शुक्रवारी करण्यात आलेल्या चाचणीत शादाब खान, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान, फखर झमान आणि वहाब रियाज यांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर हैदर अली, हारीस रौफ, इमरान खान आणि काशिफ भट्टी या चौघांचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली. त्यात हे सहा खेळाडू निगेटिव्ह असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. त्यानंतर आता या सहा खेळाडूंनाही इंग्लंडला पाठवण्यात येणार असल्याचे पाक क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले.

पाकिस्तानचे १० खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता त्यांच्या इंग्लंड दौऱ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र इंग्लंड दौऱ्यावरील तीन कसोटी सामने आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा २९ ऐवजी २० जणांचा संघ रविवारी इंग्लंडला रवाना झाला. सोशल डिन्स्टन्सिंग आणि मास्कचा वापर अशा गोष्टींचे पालन करत पाक खेळाडूंनी इंग्लंडसाठी प्रयाण केले. आता सोमवारच्या चाचणीत निगेटिव्ह आलेले खेळाडूही इंग्लंडला रवाना होणार आहेत.