वॉर्केस्टर : कर्णधार प्रियम गर्गने साकारलेल्या शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे युवा (१९ वर्षांखालील) तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत भारताने बांगलादेशला ३५ धावांनी नमवून सलग दुसरा विजय नोंदवला.

गर्गने ९७ चेंडूंत १०० धावांची खेळी उभारताना सात चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला ५ बाद २६५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने ९० चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह ६३ धावा केल्या. याशिवाय टिलक वर्मा (२३), प्रज्ञेश कनपिलीवार (२३) आणि यष्टीरक्षक ध्रुव जुरेल (३४) यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

मग भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा डाव ४७.१ षटकांत २२९ धावांत गुंडाळला. डावखुरा फिरकी गोलंदाज शुभांग हेगडे (३/५९) आणि मध्यमगती गोलंदाज कार्तिक त्यागी (४/१६) यांनी बांगलादेशच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने ५६ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ५ बाद २६४ (प्रियम गर्ग नाबाद १००, यशस्वी जैस्वाल ६३; मृत्युंजय चौधरी २/४५) विजयी वि. बांगलादेश : ४७.१ षटकांत सर्व बाद २२९ (अकबर अली ५६, शमिम हुसेन ४६; कार्तिक त्यांगी ४/१६, शुभांग हेगडे ३/५९)

प्रियम गर्ग

१००*

चेंडू     ९७

चौकार  ७

षटकार  ४