आपल्या देशाचं नाव कायम मोठं व्हावं यासाठी प्रत्येक खेळाडू जीवापाड मेहनत करत असतो. स्कायडायव्हिंग सारख्या साहसी खेळामध्ये उत्तुंग भरारी घेत पद्मश्री पुरस्कार पटकावणाऱ्या शीतल महाजन यांनी थायलंडमध्ये मराठी संस्कृतीचं जोरदार दर्शन घडवलं आहे.

मराठी माती आणि संस्कृतीचं महत्व संपूर्ण जगभर पसरलं जावं याकरता शीतल महाजन यांनी, चक्क नऊवारी साडी घालून स्कायडायव्हिंग केलं. थायलंड मधून 13 हजार फुटांवरुन शीतल महाजन नऊवारी साडी नेसून उडी घेतली. या चित्तथरारक कसरतीचा व्हिडीओ शीतल महाजन यांनी खास ‘लोकसत्ता ऑनलाईन’च्या वाचकांसाठी शेअर केला आहे.

[jwplayer koQqlnY9]

नऊवारी साडी नेसून आतापर्यंत कोणत्याही महिलेने इतक्या मोठी उंचीवरुन स्कायडायव्हिंग केल्याचं ऐकीवात नाहीये. त्यामुळे शीतल महाजन यांनी केलेल्या या प्रयत्नाला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. आतापर्यंत शीतल यांच्या नावावर १७ राष्ट्रीय तर ६ जागतिक विक्रम प्रस्थापित आहेत.