सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने वाढदिवशी झळकावलेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील पहिल्यावहिल्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा १३४ धावांनी धुव्वा उडवला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. वॉर्नरच्या नाबाद १०० धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत २ बाद २३३ धावांचा डोंगर उभा केला. या खेळीदरम्यान त्याने कर्णधार अ‍ॅरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासह शतकी भागीदाऱ्या रचल्या. त्यानंतर लेगस्पिनर अ‍ॅडम झॅम्पाच्या प्रभावी फिरकीमुळे ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला ९ बाद ९९ धावांवर रोखत दणदणीत विजयाची नोंद केली.

या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल खेळताना चाहत्यांना धोनीची आठवण झाली. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या टी २० सामन्यात मॅक्सवेलचा हेलिकॉप्टर शॉट सध्या चर्चेचा विषय ठरला. मॅक्सवेलने १८ व्या षटकात ‘धोनी स्टाईल’ हेलिकॉप्टर शॉट लगावला. मॅक्सवेलने या सामन्यात २८ चेंडूत ६२ धावांची धमाकेदार खेळी केली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला २३३ धावांपर्यंत मजल मारता आली.

पहा व्हिडीओ –

दरम्यान, अ‍ॅशेस मालिकेतील सुमार कामगिरीनंतर अवघ्या ५६ चेंडूंत १० चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद शतक झळकावत वॉर्नरने आपणही लयीत आल्याचे दाखवून दिले. वॉर्नरने डावाच्या अखेरच्या चेंडूवर आपले शतक साजरे केले. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी श्रीलंकेची आघाडीची फळी नेस्तनाबूत करत पाहुण्यांना ५ बाद ५० अशा अडचणीत आणले होते. त्यानंतर झॅम्पाने अखरेचे तीन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळवून दिला.