कोणत्याही खेळात कामाप्रती असणारी निष्ठा महत्वाची असते. खेळ कोणताही असो, प्रत्येक खेळाडूला आपल्याला दिलेल्या भूमिकेला योग्य न्याय देता येणे हि बाब साऱ्यांसाठी उपयोगाची ठरते. क्रिकेटच्या खेळात मैदानावर असलेल्या प्रत्येक खेळाडूने आपले काम योग्य पद्धतीने केले तरच संघाला अपेक्षित निकाल मिळू शकतो. केवळ खेळाडूच नव्हे तर पंचदेखील आपल्या कामाप्रती निष्ठा जपतात आणि म्हणूनच सर्व सामने निःपक्षपातीपणे पार पडतात. पंच आपले कर्तव्य नेमाने पाळतात. त्यात कसलीही कसूर करत नाहीत. अशीच घटना एका एकदिवसीय मालिकेत घडली.

श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेत पावसाचा व्यत्यय आला त्यामुळे सामना थांबण्यात आला. या सामन्यात २७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फिरकीपटू अकिला धनंनजया याने इंग्लंडच्या लिअम प्लंकेटला पायचीत केले. पाकिस्तानचे पंच अलीम दार यांनी त्याला बाद ठरवले. पण हा निर्णय अमान्य असल्याचं दाखवत प्लंकेटने DRS अंतर्गत रिव्ह्यू मागितला. याचदरम्यान पाऊस सुरू झाला. त्यामुळे खेळाडूंनी लगेच पॅव्हेलियनमध्ये धाव घेतली. परंतु अलीम दार यांनी तिसऱ्या पंचांचा निर्णय येईपर्यंत वाट पाहिली आणि भर पावसात मैदानात उभे राहिले. पंचांचा निर्णय आल्यानंतर दार यांनी प्लंकेट बाद असल्याचा निर्णय दिला आणि पळत पळत मैदानाबाहेर गेले. अलीम दार यांच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक झाले. सोशल मीडियावरही त्यांची वाहवा झाली.

दरम्यान, मालिकेतील पाचवा सामना यजमान श्रीलंकेने जिंकला. या मालिकेत यजमानांना प्रथमच जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या इंग्लंडवर विजय मिळवण्यात यश आले. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना २६.१ षटकांनंतर थांबवण्यात आला. त्यामुळे डकवर्थ लुईस प्रणालीनुसार श्रीलंकेला २१९ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.