भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज भुवनेश्वरनं धोनीला साथ दिल्याने हातून निसटत चाललेल्या सामन्यावर भारताने पुन्हा वर्चस्व मिळवलं. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर भारताकडून बुमराहने चार विकेट्स घेतल्या. नव्या दमाच्या युजेंद्र चेहलला देखील दोन बळी मिळवण्यात यश आलं. हार्दिक पांड्यानेही श्रीलंकेच्या फलंदाजीला सुरुंग लावण्यात मदत केली. अक्षरने एक विकेट्स घेतली. पण मुख्य गोलंदाज असणारा भुवनेश्वर चाललाच नाही. त्यानं आपला १० षटकांचा कोटा पूर्ण केला, पण मोकळ्या हातीच त्याला मैदान सोडावं लागलं. अर्थात आज त्याचा दिवस नसावा, असेच चित्र श्रीलंकेचा डाव संपल्यानंतर पाहायला मिळाले. श्रीलंकेच्या फलंदाजीनंतर मैदानात पावसाला सुरुवात झाली. भारताला २३१ धावांच लक्ष्य मिळालं. तीन षटकं कपात करुन मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीने शतकी भागीदारी केली. मागील सामन्यात अपयशी ठरलेल्या  रोहित शर्माने अर्धशतक ठोकले. पण त्यानंतर तो बाद झाला. रोहित पाठोपाठ शिखर धवनने देखील मैदानातून काढता पाय घेतला. त्यानंतर मैदानावर अकिला धनंजयाची जादू दिसायला सुरुवात झाली. भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना त्याने अक्षरश: नाचवले.

भारताची अवस्था केविलवाणी झाली असताना धोनी मैदानात आला. धोनी विजय मिळवून देईल, यात कुणालाच शंका नव्हती. पण प्रश्न होता तो धोनीला शेवटपर्यंत साथ कोण देईल? गोलंदाजीत अपयशी ठरलेल्या भुवनेश्वरने ही जबाबदारी लिलया पेलली. २९ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर दुष्मंत चमीरा याने मारलेला बाऊन्सर त्याने अप्रतिमरित्या सोडला. या चेंडूवरील त्याच्या हालचालीनंतर विजयी धाव घेऊनच तो परतणार, असे अनेक क्रिकेट चाहत्यांना नक्कीच वाटले असेल. सुरुवातीला संतगतीने चेंडूची पारख करणाऱ्या भुवनेश्वरने श्रीलंकेच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. नाबाद ५३ धावा करुन भारताला विजय मिळवून देणारे अर्धशतक त्याच्यासाठी अविस्मरणीय नक्कीच ठरेल. सध्याच्या घडीला भुवनेश्वरच्या खांद्यावर भारतीय संघाची मुख्य मदार असते. पण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीमध्ये अपयशी ठरल्यानंतर भुवनेश्वरने आपल्या फलंदाजीतील जादू दाखवून दिली. त्याने आजच्या खेळीने सर्वांचीच मनं जिंकली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.