स्पर्धेसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास श्रीलंका मंडळाचा नकार
स्पर्धा निवडीबाबत मनमानी निर्णय घेण्याबाबत ख्यातनाम असलेला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास श्रीलंका क्रिकेट मंडळाने नकार दिला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा मलिंगा या वेळी आयपीएल स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे.
श्रीलंका क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष थिलंगा सुमथीपाल यांनी सांगितले की, ‘मलिंगाला प्रमाणपत्र देण्यापूर्वी त्याच्या तंदुरुस्तीचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे. आमच्या परवानगीशिवाय तो आयपीएलमध्ये भाग घेऊ शकत नाही. जर त्याने आमची परवानगी न घेता खेळण्याचा निर्णय घेतला तर त्याला श्रीलंकेच्या संघातच स्थान मिळणार नाही.’
आशिया चषक स्पर्धेपासून मलिंगा व मंडळ यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. विश्वचषक स्पर्धेपूर्वी श्रीलंकेचे कर्णधारपद सोडण्याचे आदेश मलिंगाला देण्यात आले होते. श्रीलंकेच्या संघात त्याला स्थान मिळाले होते, मात्र त्याने तंदुरुस्तीच्या कारणास्तव या स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे हुकमी गोलंदाजाच्या अनुपस्थितीत श्रीलंकेला खेळावे लागले होते व गतविजेत्या श्रीलंकेला प्राथमिक फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते.