ट्वेन्टी-२० मालिकेच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचचा सहकाऱ्यांना इशारा

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात झालेल्या बिग बॅश लीगचे विजेतेपद मिळवले असले तरी भारताविरुद्ध त्यांच्याच भूमीत खेळताना तुम्हाला एखादी क्षुल्लक चूकही महागात पडू शकते, अशा शब्दांत कर्णधार आरोन फिंचने संघसहकाऱ्यांना सावध केले आहे.

२४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी फिंचकडे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून ट्वेन्टी-२० मालिकेनंतर ते भारताविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय मालिकासुद्धा खेळणार आहेत. फिंचच्या नेतृत्वाखाली मेलबर्न रेनगेड्सने मेलबर्न स्टार्सवर १३ धावांनी मात करत बिग बॅश लीगचे विजेतेपद मिळवले.

‘‘जेव्हा तुम्ही भारतीय दौऱ्यावर येता त्या वेळी आत्मविश्वास उंचावलेला असणे फार महत्त्वाचे आहे. बिग बॅश लीगच्या यशस्वी सांगतेमुळे मी स्वत: सकारात्मक विचार करत असून भारताला कडवी झुंज देण्यासाठी सज्ज झालो आहे. मात्र भारताविरुद्ध एकही चुकीचे पाऊल टाकल्यास तुम्हाला त्याचे फळ भोगावे लागू शकते, त्यामुळे गाफील राहून चालणार नाही,’’ असे फिंच म्हणाला.

‘‘भारताला त्यांच्याच मैदानांवर पराभूत करणे भल्याभल्यांना जमलेले नाही. त्यातच विराट कोहली, जसप्रीत बुमरा यांच्या पुनरागमनामुळे त्यांची ताकद आणखी वाढलेली आहे. अशा वेळी कर्णधार म्हणून संघाचा आत्मविश्वास वाढवण्याचे व भारताच्या प्रत्येक खेळाडूसाठी व्यूहरचना आखण्याचे काम मी व संघ व्यवस्थापन करत आहे,’’ असे फिंचने सांगितले.

निलंबित कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या हकालपट्टीनंतर ३२ वर्षीय फिंचच संघांची धुरा सांभाळत असला तरी फलंदाजीत त्याचे संघासाठी पुरेसे योगदान लाभलेले नाही. ‘‘स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनानंतर माझ्याकडे कर्णधारपद राहील की नाही, हे मला ठाऊक नाही. मात्र कर्णधारपदी असेपर्यंत संघाला प्रोत्साहित करण्यासाठी मी नेहमीच पुढाकार घेईन. त्याशिवाय संघाच्या पराभवाची जबाबदारी घेण्यासाठीदेखील मी सक्षम आहे. गतवर्ष माझ्यासाठी फार आव्हानात्मक ठरले, मात्र भारताविरुद्ध मी कामगिरीत नक्कीच सुधारणा करीन,’’ असे फिंचने सांगितले.

जोश हेझलवूड व मिचेल स्टार्क यांच्या अनुपस्थितीत कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत नुकतेच अव्वल स्थान मिळवणाऱ्या पॅट कमिन्सकडून फिंचला भारताविरुद्धच्या मालिकेतही  उल्लेखनीय कामगिरीची आशा आहे. त्याशिवाय अ‍ॅडम झम्पाची फिरकी प्रभावी ठरू शकते, असे तो म्हणाला. ग्लेन मॅक्सवेल, उस्मान ख्वाजा यांनीसुद्धा संघातील अनुभवी खेळाडू म्हणून खेळ सुधारावा, असे फिंचने सुचवले.