विश्वविजेतेपद गमावल्याचा धक्का पचवणे विश्वनाथन आनंदला सध्या कठीण जात आहे. तो आता आपल्या पराभवाची कारणमीमांसा करू लागला आहे. ‘‘माझी सुरुवात चांगली झाली होती. चौथ्या डावापर्यंत सारे काही आलबेल होते, पण पाचव्या डावावर मी लक्ष केंद्रित करू शकलो नाही. चांगल्या स्थितीत असताना मी एक छोटीशी चूक केली होती, त्यामुळे सर्व गोष्टी अस्थिर होत गेल्या. एका छोटय़ाशा चुकीनंतर मला मॅग्नस कार्लसनला गाठता आले नाही. हीच चूक माझ्यासाठी महाग ठरली,’’ असे आनंदने सांगितले.
विश्वविजेतेपदाच्या लढतीतील कामगिरीविषयी एका मुलाखतीत आनंद म्हणाला की, ‘‘पाचवा डाव गमावल्यानंतर मी उगाचच कार्लसनला आघाडीवर आणले. सहावा गेम मी गमावला. त्यानंतर आक्रमक खेळ करून डाव जिंकण्यासाठी धोके पत्करण्यावाचून माझ्यासमोर कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही, मात्र त्यानंतर माझा खेळ बहरलाच नाही. कार्लसनकडे अफाट बुद्धिमत्ता आहे. तो सर्वागीण कौशल्य असलेला खेळाडू आहे. कोणत्याही स्थितीत सामन्याला कलाटणी देण्याची त्याच्यात क्षमता आहे. त्याच्या या कौशल्याला मी तोडीस तोड उत्तर देऊ शकलो नाही.’’
आपल्याला मदत करणाऱ्या सहकाऱ्यांविषयी (सेकंड्स) आणि उपलब्ध तंत्रज्ञानाविषयी आनंदने सांगितले की, ‘‘सर्वच सहकाऱ्यांनी कठोर मेहनत घेऊन मला मदत केली. सरतेशेवटी मलाच प्रत्यक्ष खेळायचे होते. या लढतीसाठी माझी तयारी चांगली झाली होती. सध्या उपलब्ध असलेले सर्वोत्तम तंत्रज्ञान आमच्या दिमतीला होते. कार्लसनने या लढतीसाठी कशी तयारी केली होती, हे सांगणे कठीण आहे.’’
विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर मी आता आनंदला शिकवू शकतो, असे विधान कार्लसनने केले होते. याविषयी विचारले असता तो म्हणाला, ‘‘विजेता झाल्यानंतर कुणी काहीही बडबड करू शकतो. सध्या पुरता तरी मी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणार नाही. कार्लसन चांगला खेळाडू आहे, पण संधी मिळाली तर त्याच्याविरुद्ध पुन्हा विश्वविजेतेपदासाठी झुंजण्याची माझी तयारी आहे. पण त्यासाठी आव्हानवीराच्या स्पर्धेचा अडथळा पार करावा लागणार आहे.’’