भारताविरुद्धची कसोटी मालिका जिंकणे, हे माझ्या क्रिकेट कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे लक्ष्य आहे, असे ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने सांगितले.

‘‘ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू म्हणून अ‍ॅशेसचे महत्त्व सर्वाधिक आहे. विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक असतो. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघ अग्रस्थानावर आहे. त्यामुळे त्यांच्या देशात कसोटी मालिका खेळणे अतिशय आव्हानात्मक असते,’’ असे स्मिथने सांगितले.

‘‘मी दिवसागणिक किंवा मालिके अनुसार पुढचे लक्ष्य ठरवतो. फारशी लक्ष्ये निश्चित केली नसली तरी भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकणे माझ्यासाठी महत्त्वाचे ठरेल,’’ असे स्मिथ म्हणाला.

भारतीय खेळपट्टय़ांवर डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा सामना करणे आव्हानात्मक असते, असे स्मिथने सांगितले. गतवर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामाच्या मध्यावर राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडून स्मिथकडे सोपवण्यात आले होते. करोनामुळे १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आलेले ‘आयपीएल’ येत्या काही महिन्यांत झाल्यास स्मिथकडेच संघाचे नेतृत्व राहील.