नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचे तंत्र जटिल आहे, परंतु मानसिकता योजनाबद्ध असल्याचे मत भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. अ‍ॅशेस मालिकेमधील स्मिथच्या दिमाखदार पुनरागमनाचे सचिनने ‘ट्विटर’च्या माध्यमातून कौतुक केले आहे. चेंडू फेरफारप्रकरणी एक वर्ष बंदीची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर स्मिथने अ‍ॅशेस मालिकेत ११०.५७च्या सरासरीने एकूण ७७४ धावा केल्या आहेत. ‘‘पहिल्या कसोटीत इंग्लिश गोलंदाजांनी स्लिप आणि गलीत स्मिथचा झेल मिळावा म्हणून व्यूहरचना आखली. परंतु डावी यष्टीचे रक्षण करीत स्मिथ योग्य फटके खेळला. मग लॉर्ड्सवर लेग स्लिपला क्षेत्ररक्षण ठेवत जोफ्रा आर्चरने आखूड टप्प्यांचे चेंडू स्मिथला टाकले,’’ असे सचिनने म्हटले आहे.