भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका

मुंबई : धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधना हिने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या बळावर भारतीय महिला ‘अ’ संघाने ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात चार विकेट व सहा चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत सहा फलंदाजांच्या मोबदल्यात १६० धावांपर्यंत मजल मारली. हेदर ग्रॅहम (४३) आणि नाओमी स्टॅलेनबर्ग (३९) यांनी ऑस्ट्रेलियातर्फे महत्त्वपूर्ण खेळी केली. भारतातर्फे फिरकीपटू दीप्ती शर्मा आणि अनुजा पाटील या दोघींनीही प्रत्येकी दोन बळी मिळवले.

१६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने युवा जेमिमा रॉड्रिग्ज (४) आणि तानिया भाटिया (०) यांना स्वस्तात गमावले. मात्र २ बाद ४ धावांवरून अनुभवी हरमनप्रीत कौर व स्मृती यांनी किल्ला लढवला. स्मृतीने तिच्या नेहमीच्या शैलीत आक्रमक फटकेबाजी करताना ४० चेंडूंत सात चौकार व चार षटकारांसह ७२ धावा ठोकल्या. हरमनप्रीतनेही ३९ चेंडूंत ४५ धावा करत तिला चांगली साथ दिली. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी रचून भारताला विजयासमीप नेले.

स्मृती व हरमनप्रीत बाद झाल्यानंतर पूजा वस्त्राकर (नाबाद २१) व दीप्ती (नाबाद ११) यांनी आणखी धोका न पत्करता संघाचा विजय सुनिश्चित केला. सहा फलंदाजांच्या मोबदल्यात १९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर भारताने विजय मिळवला. मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळला जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया ‘अ’ : २० षटकांत ६ बाद १६० (हेदर ग्रॅहम ४३, नाओमी स्टॅलेनबर्ग ३९; अनुजा पाटील २/२२). पराभूत वि.

भारत ‘अ’ : १९ षटकांत ६ बाद १६३ (स्मृती मानधना ७२, हरमनप्रीत कौर ४५; लॉरेन चीटल २/१८).