IPL 2020 साठीचा मार्ग रविवारी मोकळा झाला. IPL गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी झालेल्या बैठकीत युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केली. या स्पर्धेला केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांना २० ऑगस्टनंतर युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

IPLच्या आयोजनाची अधिकृत घोषणा करण्याबरोबरच BCCI आणि गव्हर्निंग काऊन्सिलने भारतीय महिलांसाठीच्या IPL स्पर्धेलाही मान्यता दिली. याचसंदर्भात टीम इंडियाची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मंधाना हिने एका ट्विटच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं. IPLच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जेव्हा तारखांची घोषणा करण्यात आली. तेव्हा त्याच ट्विटवर कमेंट करत स्मृतीने एक ट्विट केले. “(IPLचे आयोजन) नक्कीच स्वागतार्ह आहे. (पण) मी मात्र महिलांसाठी आयोजित होणाऱ्या IPLस्पर्धेत खेळण्याची वाट पाहते आहे”, असे सांगलीकर स्मृतीने ट्विट केले.

गेल्या काही वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठीच्या IPL स्पर्धेला अखेरीस गव्हर्निंग काऊन्सिलने मान्यता दिली. IPLच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनासाठी रविवारी गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक पार पडली. त्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने याआधी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना महिला खेळाडूंसाठी आयपीएलचं आयोजन होणार असल्याची माहिती दिली होती. ४ संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार असून १ ते १० नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाईल असेही सांगितले होते. या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद व इतर बाबींचा अभ्यास केल्यानंतर आगामी काळात महिलांसाठी IPLचा पूर्ण हंगाम भरवण्याचा BCCIचा प्रयत्न असल्याचं सौरव गांगुलीने सांगितलं होतं.