भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना सध्या आपल्या सांगलीतल्या घरी आहे. देशात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. त्याआधी एक दिवस स्मृती मुंबईवरुन आपल्या सांगलीतल्या घरी परतली होती. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून ती क्वारंटाइन झालेली असून महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी तिच्यावर नजर ठेवून आहेत. मात्र या काळात बीसीसीआयच्या BCCI Women या अधिकृत ट्विटर हँडलने क्रिकेट चाहत्यांना स्मृतीला त्यांच्या मनातले प्रश्न विचारण्याची संधी दिली.

ट्विटरवर चाहत्यांनी या संधीचा लाभ घेत स्मृतीला क्रिकेटविषयी, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. एका चाहत्याने स्मृतीला तुझ्या होणाऱ्या साथीदारासाठी काय निकष आहेत असा प्रश्न विचारला.

स्मृतीने या प्रश्नाला अतिशय सुंदर पद्धतीने उत्तर देत सर्वांची मनं जिंकली.

नुकत्याच ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत स्मृती सहभागी झाली होती. मात्र अंतिम सामन्यात भारतीय महिलांना पराभवाचा सामना करावा लागला. या संपूर्ण स्पर्धेत स्मृतीला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आली की स्मृती मैदानात उतरल्यानंतर आश्वासक कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे.