भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चौथ्या सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. या सामन्यातील विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी मिळवली. या मालिका पराभवानंतर भारत आणि कर्णधार कोहली यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहेत. या दरम्यान माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही कोहलीवर टीका केली आहे.

ज्यावेळी धोनीकडून विराटने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. धोनीचा मैदानावरील स्वभाव हा शांत होता. पण कोहली मात्र आक्रमक स्वभावाचा खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. सुरुवातीला त्याने चांगली कामगिरी केली, पण त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दौऱ्यांवर भारताची असमाधानकारक कामगिरी झाली. त्यामुळे आता कोहलीच्या नेतृत्वाबद्दल सर्रास प्रश्न विचारले जाणारच, असे विधान गावस्कर यांनी केले आहे.

याशिवाय, हार्दिक पांड्या आणि रविचंद्रन अश्विन या दोघांवरही त्यांनी टीका केली आहे. अश्विन आणि पांड्या हे दोन खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात खेळतात. पण मला ते अष्टपैलू वाटत नाहीत. या दोघांकडे चांगली गुणवत्ता आहे, पण त्यांना स्वतःला सिद्ध करता आले नाही. चौथ्या सामन्यात या दोनही खेळाडूंकडे सामना जिंकवून देण्याची सुवर्णसंधी होती. पण या दोघांनी जबाबदारीने खेळ केला नाही, असे गावस्कर म्हणाले.

इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत कसोटी मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले होते. भारताने चौथा सामना जिंकला असता तर त्यांना मालिकेत बरोबर करता आली असती. चौथ्या सामन्यात भारताला विजयाची संधी होती, पण भारतीय खेळाडूंनी अपरिपक्व खेळ केला आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.