भारतीय क्रिकेट संघाचा युवा आणि स्टार फलंदाज पृथ्वी शॉ गेल्या वर्षी आयपीएलमधे चांगली कामगिरी करु शकला नव्हता. ऑस्ट्रेलियामधील त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला पहिल्या कसोटीनंतर त्याला वगळण्यात आलं होतं. यानंतर इंग्लंड दौर्‍यासाठीच्या संघात देखील सामील होऊ शकला नाही. दरम्यान, पृथ्वी शॉने त्याच्या खेळाकडे बरेच लक्ष दिले आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने शानदार पुनरागमन केले. यानंतर तो आयपीएलच्या १४ हंगामामध्ये फॉर्ममध्येही दिसला. अवघ्या २१वर्षाच्या पृथ्वी शॉने वर्षी अनेकांची शाबासकी मिळवली आहे. उत्कृष्ट गोलंदाजांसमोर पृथ्वी घाबरलेला दिसत नसला तरी राहुल द्रविडपासून त्याला थोडी भीती वाटत असल्याचे त्याने कबूल केले आहे. पृथ्वीने राहुल द्रविडसोबतचा १९ वर्षाखालील वर्ल्डकपचा दरम्यानचा ​​अनुभव सांगितला आहे.

शॉच्या नेतृत्वात १९ वर्षाखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता आणि द्रविड त्यावेळी संघाचा प्रशिक्षक होता. द्रविड सर नेहमी सर्वांना नैसर्गिक खेळ खेळायला सांगत असतात. जर एकच चूक पुन्हा होत असेल तर ते त्यात सुधार करायला ते सांगतात असे शॉ म्हणाला.

“वर्ल्ड कपच्या आधी आम्ही सरांबरोबर (द्रविड) बरोबर एकत्र गेलो होतो. त्यांनी कोणत्याही खेळाडूला त्याच्यासारखे खेळण्यास भाग पाडले नाही. मला माझ्या नैसर्गिक खेळाशी जुळवून घेण्यास सांगितले. मी पॉवरप्लेमध्ये खेळलो तर मला बाहेर काढणे कठिण असल्याचे त्यांना माहित होते,” असे शॉने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

“ते मुख्यतः खेळाडूची मानसिकता, डावपेच याबद्दल बोलत असत. ते फक्त मिटींगशिवाय कधी जास्त बोलत नसत. आम्ही खेळाचा आनंद घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. जर एक चूक पुन्हा करत असाल तर तर ते आमच्याकडे येत आणि त्याबद्दल सांगत, असे शॉने सांगितले.

अंडर -१९ च्या संघला द्रविड जेव्हा प्रशिक्षण देत होते तेव्हा थोडा घाबरला होतो, असेही शॉने सांगितले. परंतु भारताचा हा माजी कर्णधार मैदानाबाहेर एकदम मित्राप्रमाणे आमच्याबरोबर राहत होता. “राहुल सरांसोबत असताना तुम्हाला शिस्त असावीच लागते. त्यामुळे आम्ही त्यांना थोडे घाबरलो. मैदानाबाहेर ते आमच्याशी अगदी मित्रासारखे होते, रात्रीच्या जेवणासाठी आमच्यासोबत असायचे. त्याच्यासारख्या महान व्यक्तीसोबत बसण्याचं स्वप्न प्रत्येक तरुण पाहत असतो आणि आमचे ते पूर्ण झाले,” असे शॉने सांगितले.

नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीचे (एनसीए) संचालक असणाऱ्या द्रविडने आपल्या कार्यकाळात अनेक युवा खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. केले होते. ते सर्व आता भारतीय संघाकडून खेळत आहेत. शॉने देखील द्रविडकडूनच प्रशिक्षण घेतले आहे. द्रविडला तरुणांची विचारपद्धती माहित आहे, असे मत शॉने व्यक्त केले.