भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

संधी मिळाल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) तीन विश्वचषक स्पर्धामध्ये यष्टिरक्षण करायला मला आनंद होईल. मात्र याबाबत अद्याप संघ व्यवस्थापनाशी माझे कोणतेही बोलणे झाले नाही, असा विश्वास मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी भारताचा उपकर्णधार लोकेश राहुलने व्यक्त केला.

यष्टिरक्षक ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्यावर मात करत मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी राहुलने यष्टिरक्षक म्हणून भारतीय संघातील आपले स्थान निश्चित केले आहे. पुढील तीन वर्षांमध्ये दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा तसेच एकदिवसीय विश्वचषक अशा ‘आयसीसी’च्या तीन महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत.

राहुलवर यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवल्यानंतर भारतीय संघात एक अतिरिक्त गोलंदाज अथवा फलंदाज खेळवण्याचा पर्याय भारतीय संघ व्यवस्थापनासमोर असेल. ‘‘यष्टिरक्षण करायला मला आवडेल, तसेच भारतीय संघात एका विशेषज्ञ गोलंदाज अथवा फलंदाजाची भर पडेल. संधी मिळाल्यास, देशासाठी पुढील तीन विश्वचषक स्पर्धामध्ये यष्टिरक्षण करण्याची माझी तयारी आहे,’’ असे राहुलने सांगितले.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. तो म्हणाला की, ‘‘माझ्यावर कोणती जबाबदारी सोपवायची, याबाबत संघ व्यवस्थापनाशी अद्याप कोणतेही बोलणे झाले नाही. विश्वचषक स्पर्धा आमच्यासाठी महत्त्वाची असून प्रत्येक संघ दूरदृष्टीने त्यासाठी तयारी करत असतो. माझ्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असून मी त्याचाच विचार करत आहे. फलंदाजी तसेच यष्टय़ांमागे सातत्यपूर्ण कामगिरी करणे हेच माझे ध्येय आहे.’’

एकदिवसीय क्रिकेटमध्ये राहुल पाचव्या क्रमांकावर, तर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजीस उतरत आहे. फलंदाजीच्या क्रमाविषयी त्याने सांगितले की, ‘‘संघासाठी गरजेप्रमाणे तसेच फलंदाजीचा योग्य ताळमेळ साधत कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास मी तयार आहे. संघाने सोपवलेली जबाबदारी चोखपणे निभावण्याचा मी प्रयत्न करत असतो.’’

‘विलगीकरणाचा काळ खडतर’

१४ दिवसांचा विलगीकरणाचा काळ सर्वात खडतर असल्याचे मत लोकेश राहुलने व्यक्त केले. तो म्हणाला, ‘‘जेव्हा मैदानावर सहकाऱ्यांसोबत सरावासाठी उतरतो, त्यामुळे थोडे बरे वाटते. मात्र हॉटेलमधील खोलीत पतरल्यावर एकटेपणा खायला उठतो. सहकाऱ्यांसोबत सराव करताना मजामस्ती करत असल्यामुळे थकवा निघून जातो. तोच दिवसातील सर्वोत्तम क्षण असतो. खोलीत परतल्यावर पुन्हा नवी आव्हाने सुरू होतात.’’

धोनीची जागा कुणीही घेऊ शकत नाही

वेगवेगळ्या परिस्थितीत यष्टीरक्षणाची जबाबदारी पार कशी पाडायची, याचे उत्तम उदाहरण महेंद्रसिंह धोनीने जगासमोर दाखवून दिले आहे. त्यामुळे त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही, असे लोकेश राहुलने सांगितले. ‘‘विविध खेळपट्टय़ांवर गोलंदाजी कशी करायची, हे धोनी फिरकीपटूंना सांगायचा. यष्टीरक्षकाची ही जबाबदारी मी न्यूझीलंड दौऱ्यात पार पाडली होती,’’ असेही राहुल म्हणाला.

बुमराचे कार्तिक त्यागीला मार्गदर्शन

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याने युवा गोलंदाज कार्तिक त्यागीला वेगवान गोलंदाजीसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. भारतीय क्रिकेट संघ १० दिवसांआधीच ऑस्ट्रेलियात दाखल झाला असून विलगीकरणानंतर पांढऱ्या आणि लाल चेंडूसह सराव करत आहे. सरावासाठीचा गोलंदाज म्हणून संघात समावेश असलेल्या त्यागीला बुमराने बुधवारी मोलाचे सल्ले दिले.