चार जणांचं कुटुंब.. वडील ट्रकचालक.. महिनाअखेरीस हिशोबाची हातमिळवणी करताना होणारी ओढाताण.. एखादा क्रीडापटू घडण्यासाठी ही अनुकूल परिस्थिती नक्कीच नाही.. परंतु इच्छाशक्ती दुर्दम्य असेल तर परिस्थितीलाही शरण आणता येते, हे नागपूरच्या रोहिणी राऊतने सिद्ध केले. दहाव्या मुंबई मॅरेथॉनमध्ये रोहिणीने महिलांची पूर्ण मॅरेथॉन शर्यत ३ तास, ३ मिनिटे आणि २१ सेकंदात पूर्ण करत भारतीय धावपटूंमध्ये तिसरे स्थान पटकावले.
विजयानंतर बोलताना रोहिणीने आपला कष्टप्रद प्रवास उलगडला. ‘‘आई-वडिलांचे जेमतेम प्राथमिक शिक्षण झाले आहे. त्यांना खेळाबाबतची काहीही माहिती नाही. मात्र आपली मुलगी काहीतरी चांगले करून दाखवेल, हाच विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला आणि म्हणूनच ही वाटचाल शक्य झाली. सकस आहार, महागडे शूज, ठिकठिकाणचा प्रवास हा सगळा आर्थिक भार माझे वडीलच सांभाळतात. ट्कचालकाच्या व्यवसायामुळे ते अनेक दिवस घरापासून दूर असतात. घरी आले की सरावाबाबत, स्पर्धाबाबत आवर्जून चौकशी करतात. मात्र धावणं सोडून अभ्यासाकडे लक्ष दे, असा अट्टाहास कधीच करत नाहीत.’’
 रोहिणीच्या मावशीची मुलगी राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्सपटू. तिच्या प्रोत्साहनामुळेच खेळाकडे आणि पर्यायाने धावपटू होण्याचे स्वप्न रोहिणीने जोपासले. मात्र अजूनही सराव करण्यासाठी चांगला ट्रॅक नसल्याची खंत रोहिणीने बोलून दाखवली. ‘‘मी आणि माझी जुळी बहीण मोनिका दोघींनाही प्रशिक्षक नाही. कुठून तरी माहिती गोळा करायची आणि स्वत:च्या जबाबदारीवर सराव करायचा, हा आमचा नित्यक्रम. पण आम्हाला पुरस्कर्ता मिळाल्यास, पालकांवर असलेला आर्थिक बोजा कमी होईल आणि सरावाकडे चांगल्या रीतीने लक्ष केंद्रित करता येईल. पहिल्याच मॅरेथॉन शर्यतीत यश मिळाल्याने आता मी मॅरेथॉनवरच पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे, असे तिने सांगितले.