जागतिक फुटबॉल क्षेत्रावर हुकूमत गाजवणाऱ्या फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशनला (फिफा) बुधवारी जबर धक्का बसला आणि फुटबॉल जगतावर शोककळा पसरली. स्वित्र्झलड पोलिसांनी ज्युरिच येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी अचानक धाड टाकून फिफा उपाध्यक्ष जेफरी वेब व इयुगेनिओ फिगुएरेडो यांच्यासह सात जणांना अटक केल्याचे स्वित्र्झलडच्या अधिकाऱ्यांनी पत्रकात म्हटले k03आहे. पण अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चौदा जणांची नावे आरोपपत्रामध्ये दाखल करण्यात आली आहेत.  या अधिकाऱ्यांनी जवळपास १५०० लाख डॉलर्सची लाच घेऊन प्रमुख फुटबॉल स्पर्धाच्या प्रसारणाचे हक्क दिल्याचे आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.  या आरोपींना पुढील चौकशीसाठी अमेरिकेकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
फिफाचे अधिकारी ज्युरिच येथील बौर आउ लॅक हॉटेलमध्ये वार्षिक सर्वसाधारण बैठकीसाठी एकत्र आले होते. त्याचदरम्यान १२ हून अधिक स्वित्र्झलडच्या कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी कोणतीही कल्पना न देता धाड टाकली. अटक केलेल्या अधिकाऱ्यांना अगदी शांततेने त्यांनी हॉटेलबाहेर आणले आणि पुढील तपासासाठी कारागृहात नेले. विश्वचषक स्पध्रेच्या आयोजन प्रक्रियेबरोबरच विपणन व प्रसारणाच्या करारात हे अधिकारी गेली दोन दशके भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप फेडरर ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडूने (एफ.बी.आय.) केला आहे.
याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात १४ जणांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच फिफा अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबानुसार या प्रकरणात अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका येथील क्रीडा विपणन कार्यकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी जवळपास १५०० लाख डॉलर्सची लाच देऊन प्रमुख फुटबॉल स्पर्धाच्या प्रसारणाचे हक्क आपल्याकडे ठेवले असल्याचे आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.
फिफा अधिकाऱ्यांमध्ये ली, जेफरी वेब, इयुगेनिओ फिगुएरेडो, जॅक वॉर्नर, जुलीओ रोचा, कोस्टास टक्कास, राफेल एस्क्वीवेल, जोस मारिआ मारिन आणि निकोलस लेओझ यांचा समावेश आहे. तसेच अलेजांड्रो बुर्जाको, अ‍ॅरोन डेव्हिडसन, ह्य़ुगो जिंकीस आणि मारिआनो जिंकीस या क्रीडा विपणन कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या आर्थिक व्यवहारात मध्यस्थाची भूमिका वटवणाऱ्या जोस माग्र्युलिएस याच्यावरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सेप ब्लाटर यांच्या अध्यक्षपदाच्या मार्गावर अडथळा निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र, या कारवाईत ब्लाटर यांच्या नावाचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. फिफामध्ये सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे ब्लास्टर शुक्रवारी पाचव्यांदा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी सज्ज झाले आहेत.

कशासाठी अटक?
फिफाच्या अधिकाऱ्यांनी जवळपास १५०० लाख डॉलर्सची लाच घेऊन प्रमुख फुटबॉल स्पर्धाच्या प्रसारणाचे हक्क दिल्याचे आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात १४ जणांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच फिफा अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबानुसार या प्रकरणात अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका येथील क्रीडा विपणन कार्यकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

चौदा आरोपी कोण?
अमेरिकेच्या पोलीसांनी एकूण चौदा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. या चौदा जणांपैकी ९ फुटबॉल खेळाशी निगडीत अधिकारी असून अन्य पाच व्यक्ती क्रीडा विपणन कार्यकारी अधिकारी आहेत.

अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारीच
अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाल्याने प्रतिमा मलिन झाली असली तरी नियोजित तारखेलाच अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडण्याच्या भूमिकेवर फिफा ठाम आहे.
फि फाचे प्रसिद्धीप्रमुख वॉल्टर डी ग्रेगोरिओ यांनी ही कारवाई फिफामधील भ्रष्टाचार दूर करण्यास मदतशीर असल्याचे सांगितले. या कारवाईमुळे ब्लाटर हे निवडणूक पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात असल्याच्या वृत्ताचे ग्रेगोरिओंनी खंडन केले. ते म्हणाले की, ‘‘गत वर्षी १८ नोव्हेंबरला फि फाने भ्रष्टाचाराविरुद्धच्या कारवाईसाठी पुढाकार घेतला होता. तसेच आम्ही २०१८ आणि २०२२ च्या विश्वचषक लिलाव प्रक्रिये संदर्भात कायदेशीर तक्रार केली होती. बुधवारी झालेल्या कारवाईचे फिफाकडून स्वागत आणि या संबंधित सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आम्ही देऊ इच्छितो.’’
 ‘‘ या प्रकरणात सहसचिव आणि अध्यक्षांचा सहभाग नाही. या कारवाईमुळे फिफा बैठक किंवा निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’’, असे ग्रेगोरिओंनी स्पष्ट केले. मात्र, या कारवाईमुळे फिफामधील भ्रष्टाचार दूर होईल असा विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘‘ही कारवाई फिफाच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आहे, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी आहे, परंतु संघटनेतील मलिनता नाहीशी होण्याची दृष्टीने ती महत्त्वाची आहे.’’