भारत-इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेच्या चौथ्या सामन्यापासून ‘सॉफ्ट सिग्नल’वरुन वाद सुरू आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात मंगळवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील एका निर्णयामुळे पुन्हा एकदा ‘सॉफ्ट सिग्नल’बाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसन याने स्वतःच्या गोलंदाजीवर बांगलादेशचा फलंदाज तमिम इकबाल याचा शानदार झेल पकडला. मैदानावरील पंचानीही आउट असा ‘सॉफ्ट सिग्नल’ दिला. पण तिसरे पंच, ख्रिस गॅफनी यांनी चक्क मैदानावरील पंचांच्या ‘सॉफ्ट सिग्नल’कडे दुर्लक्ष केलं आणि फलंदाजाला ‘नॉट आउट’ दिलं.

(‘सॉफ्ट सिग्नल’वरुन वाद! मला कळत नाही अंपायर ‘I Don’t Know’ सिग्नल का नाही देऊ शकत : विराट कोहली)

बांगलादेशच्या फलंदाजीदरम्यान १५ व्या षटकात हा प्रकार झाला. विविध अँगल्समधून ‘रिप्ले’ बघितल्यानंतर तिसऱ्या पंचांनी तमिम इकबालच्या बाजूने निर्णय दिला. जेमिसनने कॅच घेतला पण कॅच घेताना तो पूर्ण नियंत्रणात नव्हता, असं म्हणत तिसरे पंच ख्रिस गॅफनी यांनी मैदानावरील पंचांनी सॉफ्ट सिग्नल आउट असा दिलेला असतानाही फलंदाज नॉट आउट असल्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.


दरम्यान, तिसऱ्या पंचांचा हा निर्णय भारत-इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेतल्या निर्णयांच्या उलटा ठरलाय. अहमदाबादमध्ये झालेल्या चौथ्या टी-२० मध्ये मैदानावरील पंचांनी दिलेल्या सॉफ्ट सिग्नलच्या आधारेच तिसऱ्या पंचांनी सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदरला बाद ठरवलं होतं. त्यावरुन बराच वाद झाला होता, सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही नाराजी व्यक्त करत सॉफ्ट सिग्नलवर बोट ठेवलं होतं.

(‘सॉफ्ट सिग्नल’वरुन वाद! मला कळत नाही अंपायर ‘I Don’t Know’ सिग्नल का नाही देऊ शकत : विराट कोहली)