लेटन हेविटने मार्टिन डेल-पोत्रो याच्यावर मात करीत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद केली. ३२ वर्षीय हेविटने जुआनला रोमहर्षक लढतीत ६-४, ५-७, ३-६, ७-६ (७-२), ६-१ असे हरवले. याचप्रमाणे गतविजेत्या सेरेना विल्यम्सने  कझाकिस्तानच्या यारोस्लावा श्वेदोवा हिच्यावर ६-३, ६-१ अशी मात करून चौथ्या फेरीत स्थान मिळवले आहे.
अँडी मरेने अर्जेटिनाच्या लिओनार्द मेयेर याच्यावर ७-५, ६-१, ३-६, ६-१ अशी मात केली. नोवाक जोकोव्हिचने जर्मनीच्या बेंजामिन बेकरचे आव्हान ७-६ (७-२), ६-२, ६-२ असे संपुष्टात आणले. पाचवा मानांकित टॉमस बर्डीच याने अमेरिकेच्या डेनिस कुडोल याच्यावर ७-६ (७-३), ७-६ (७-३), ६-३ असा विजय नोंदविला.

सोमदेवचे आव्हान संपुष्टात
इटलीच्या आंद्रेस सेपीने सोमदेव देववर्मनला ७-६ (१०-८), ६-४, ७-५ असे चिवट लढतीनंतर पराभूत केले. मिश्र दुहेरीत युआंग जान चेन व रॉबर्ट लिंडस्टेड यांनी महेश भूपती व मार्टिना िहगिसचा ७-६ (७-५), ७-६ (७-५) असा पराभव केला. रोहन बोपण्णाने एडुआर्ड रॉजर व्हॅसेलीन याच्या साथीत अमेरिकेच्या ब्रॅडली क्लान व सॅम क्विएरी यांना ६-२, ६-४ असे नमविले. मात्र मिश्र दुहेरीत बोपण्णा व ज्युलिया जॉर्जेस यांना अबिगेली स्पीअर्स व सान्तीयागो गोन्झालेझ यांनी ६-७ (१-७), ६-२, १०-६ असे हरविले.