अतिशय थंड वातावरणासाठी प्रसिद्ध ख्राइस्टचर्च येथे सुरू झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताने १-१ अशी बरोबरी केली. सलामीच्या लढतीत सोमदेव देववर्मनला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र युकी भांब्रीने दुसऱ्या लढतीत विजयासह भारताला बरोबरी करून दिली.
जागतिक क्रमवारीत ५४८व्या स्थानी असणाऱ्या मायकेल व्हीनसने सोमदेववर ४-६, ४-६, ६-३, ६-३, ६-१ असा विजय मिळवला. तीन तास आणि ४३ मिनिटे चाललेल्या लढतीत सोमदेवने पहिले दोन्ही सेट जिंकत आश्वासक सुरुवात केली. घरच्या मैदानावर चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा लाभलेल्या व्हीनसने जिद्दीने पुनरागमन करत शानदार विजय मिळवला. अमेरिकेतील चॅलेंजर स्पर्धेच्या जेतेपदासह आत्मविश्वास उंचावलेला सोमदेव भारताच्या योजनेचा मुख्य भाग होता. मात्र सलामीच्या लढतीतच त्याला पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारतीय संघावरील दडपण वाढले.
दुसऱ्या सामन्यात युकी भांब्रीने जोस स्टॅथमवर ६-२, ६-१, ६-३ अशी सरळ सेट्समध्ये मात केली. जागतिक क्रमवारीत १५१व्या स्थानी असलेल्या युकीने पहिल्या सेटमध्ये ३-२ अशी आघाडी घेतली. या आघाडीच्या बळावर आगेकूच करत त्याने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही युकीने स्टॅथमची सव्‍‌र्हिस भेदत दमदार वाटचाल केली. युकीच्या आक्रमक खेळासमोर स्टॅथम निष्प्रभ ठरला. तिसऱ्या सेटमध्ये युकीने ४-२ अशी आघाडी घेतली.
या आघाडीच्या जोरावर युकीने वाटचाल करत युकीने तिसऱ्या सेटसह सामना जिंकला. या लढतीतील विजेत्या संघाला वर्ल्ड ग्रुप प्ले ऑफमध्ये स्थान मिळणार आहे. त्यामुळे या लढतीला विशेष महत्त्व आहे.