फॉर्मसाठी झगडणाऱ्या सोमदेव देववर्मनला चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेतील सलामीच्या लढतीत सहाव्या मानांकित येन लुई याच्याशी झुंजावे लागणार आहे.
सोमदेव याला गेल्या वर्षी फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे त्याचे मानांकन १३८ पर्यंत खाली आले होते. त्याला चेन्नईतील स्पर्धेत विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान देण्यात आले आहे. चीन तैपेईचा खेळाडू लुईला जागतिक क्रमवारीत ३८ वे स्थान आहे. आतापर्यंत सोमदेवने त्याच्याविरुद्ध सर्व सामने जिंकले असले तरी यंदा सोमदेवला झगडावे लागणार
आहे.
विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान मिळालेल्या रामकुमार रामनाथनला पहिल्या फेरीत जपानच्या तात्सुमा इतोशी खेळावे लागणार आहे.
गतविजेता व जागतिक क्रमवारीत चौथे मानांकन असलेला स्टानिस्लास वॉवरिन्क याला यंदा पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे.

युकी भांब्री, जीवनचे  आव्हान कायम
भारताच्या युकी भांब्री व जीवन नेदुन्चेळियन यांनी स्पर्धेतील पात्रता फेरीत विजयी वाटचाल राखली. भांब्रीने सिद्धार्थ रावत याचा ६-१, ६-३ असा पराभव केला. डावखुरा खेळाडू जीवनने लक्षित सूदचे आव्हान ६-२, ६-२ असे संपुष्टात आणले. विनायक काझा याने अपराजित्व राखताना थायलंडच्या दानाई उदोमचोकला ३-६, ६-४, ६-२ असे हरविले. शशी मुकुंदने फहाद महम्मदवर ६-३, ६-४ असा विजय मिळविला.
राष्ट्रीय हार्डकोर्ट विजेता विष्णुवर्धनने सूरज प्रबोधला ६-१, ६-३ असे पराभूत केले. एन. विजयसुंदर प्रशांत याच्याविरुद्ध १-६, २-५ अशा पिछाडीवर असताना निकी पुनेचाने सामना सोडून दिला.