भारताच्या सोमदेव देववर्मनने ऑस्ट्रेलियन एटीपी टेनिस पात्रता स्पर्धेत आव्हान टिकवले आहे. त्याने बेल्जियमच्या नील डेसीन याच्यावर ६-२, २-६, ६-४ अशी मात केली. सोमदेवला चेन्नई स्पर्धेत रामकुमार रामनाथन या नवोदित खेळाडूकडून पराभवाचा धक्का बसला होता. त्या पाश्र्वभूमीवर येथे सोमदेवने आत्मविश्वासाने खेळ केला. पावणेदोन तास चाललेल्या लढतीत त्याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. पहिल्या सेटमध्ये त्याने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये त्याला स्वत:च्या खेळावर नियंत्रण ठेवता आले नाही. हा सेट त्याने गमावला. तथापि, तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा त्याने सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. याच ब्रेकच्या आधारे त्याने विजयश्री खेचून आणली. सोमदेवला पुढच्या सामन्यात जर्मनीच्या जॉन लिनार्ड स्ट्रफ याच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. जॉन याने अग्रमानांकित मिखाइल कुकुश्किन याच्यावर ७-६ (८-६), ६-२ असा विजय मिळविला.