डेव्हिस संघाची आज निवड होणार
इंडोनेशियाविरुद्ध ५ ते ७ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस लढतीकरिता भारतीय संघाची निवड शनिवारी होणार आहे. एकेरीतील अव्वल दर्जाचे खेळाडू सोमदेव देववर्मन व युकी भांब्री यांचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
अव्वल अकरा खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतास दक्षिण कोरियाविरुद्धच्या आशिया/ओशेनिया गटाच्या लढतीत १-४ असा पराभव स्वीकारावा लागला होता. भारताच्या या अकरा खेळाडूंनी अखिल भारतीय टेनिस संघटनेविरुद्ध सुरु केलेले आंदोलन सध्या थांबविले असून डेव्हिस लढतीत सहभाग निश्चित केला आहे. त्यामुळेच सोमदेव व भांब्री यांचे पुनरागमन होण्याची शक्यता वाढली आहे. सोमदेव याने फ्रान्समध्ये सुरु असलेल्या एटीपी स्पर्धेत दुसऱ्या फेरीपर्यंत मजल गाठली होती. त्याने पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीतील ३९ वा मानांकित खेळाडू बेनॉईट पेअरी याच्यावर सनसनाटी विजय नोंदविला होता. युकी याने कनिष्ठ गटात जेवढी सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी केली होती, तेवढी कामगिरी त्याला वरिष्ठ गटात दाखविता आलेली नाही. मात्र त्याने गतवर्षी न्यूझीलंडविरुद्ध चंडीगढ येथे झालेल्या डेव्हिस लढतीत एकेरीचे दोन्ही सामने जिंकले होते.
दुहेरीत लिएंडर पेस व पुरव राजा याच जोडीवर भारताची भिस्त राहील असा अंदाज आहे. कोरियाविरुद्धच्या लढतीत पेस याने शानदार खेळ केला होता. त्याने राजा याच्या साथीत दुहेरीत विजय मिळविला होता. ऑलिम्पिकमध्ये पेसच्या साथीत खेळलेल्या विष्णु वर्धन याला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
रोहन बोपण्णा व महेश भूपती या दोन्ही खेळाडूंना बेशिस्त वर्तनाबद्दल भारतीय संघातून डच्चू देण्यात आला होता व त्यांच्यावर दोन वर्षांकरिता बंदी घालण्यात आली आहे. या बंदीविरुद्ध या खेळाडूंनी जरी न्यायालयात स्थगिती मिळविली असली तरी त्यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. बंडखोर खेळाडूंपैकी सनमसिंग, श्रीराम बालाजी, साकेत मिनेनी यांच्या तुलनेत विजयंत मलिक व व्ही.एम.रणजित यांचे मानांकन कमी असले तरी मलिक व रणजित यांचा कोरियाविरुद्धच्या लढतीकरिता भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. त्यामुळेच कदाचित पुन्हा त्यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे. बंडखोर खेळाडूंनी संघाचे न खेळणारे कर्णधार एस.पी.मिश्रा यांच्याऐवजी अन्य प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी केली असली तरी संघटनेने मिश्राचे स्थान कायम ठेवले आहे.