News Flash

वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेवर काही राज्यांच्या बहिष्काराचे सावट?

अन्य राज्यांप्रमाणेच दिल्ली आणि उत्तरांचल यांनीही अखिल भारतीय कॅरम महासंघाला स्पर्धेचा प्रवेशअर्ज पाठविला. परंतु स्पर्धेला काही तास उरले असतानाच या राज्यांना ‘तुम्हाला सहभागी होता येणार

| February 25, 2013 02:16 am

अन्य राज्यांप्रमाणेच दिल्ली आणि उत्तरांचल यांनीही अखिल भारतीय कॅरम महासंघाला स्पर्धेचा प्रवेशअर्ज पाठविला. परंतु स्पर्धेला काही तास उरले असतानाच या राज्यांना ‘तुम्हाला सहभागी होता येणार नाही’, असे नियमावर बोट दाखवून अखिल भारतीय कॅरम महासंघाने (एआयसीएफ) सांगितल्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या पाश्र्वभूमीवर अकोल्यात २६ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान होणाऱ्या ४२व्या वरिष्ठ कॅरम स्पर्धेवर काही राज्य संघटना बहिष्कार घालण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते.
शुक्रवारी एआयसीएफने दिल्ली आणि उत्तरांचल या राज्यांना तुम्ही ‘कोलकात्यातील सब-ज्युनिअर स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. त्यामुळे तुम्हाला वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, असे कळवले आणि कॅरमक्षेत्रात एकच खळबळ उडाली. एआयसीएफने हा निर्णय नियमाला धरून घेतला असला तरी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेचे अर्ज दिल्ली आणि उत्तरांचल या दोन्ही राज्यांना का पाठवण्यात आले, या प्रश्नाचे ठाम उत्तर महासंघाकडून मिळालेले नाही.
‘एआयसीएफ’चे सरचिटणीस बाबुलसिंग बच्चर यांना याबाबतीत विचारले असता ते म्हणाले की, ‘‘सध्याच्या घडीला ‘ई-मेल’द्वारे अर्ज पाठवण्यात येतात, त्यामुळे एकाच वेळी सगळ्यांनाच अर्ज पाठविण्यात आले. दिल्ली आणि उत्तरांचल यांनी सब-ज्युनिअर स्पर्धेत सहभाग न घेतल्याने त्यांना या स्पर्धेत न खेळवण्याचा निर्णय आम्ही घेतला, पण खेळाडूंचे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही दोन्ही राज्यांच्या खेळाडूंना ‘एआयसीएफ’च्या नावाखाली खेळण्याची संधी देत आहोत. या दोन्ही राज्यांतील खेळाडू स्पर्धेसाठी रवाना झाले असून त्यांना आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करता येणार नाही.’’
याबाबत काही राज्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता नाव न घेण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, ‘‘एआयसीएफ’चा हा निर्णय अनाकलनीय आणि धक्कादायक आहे. जर महासंघाला दिल्ली आणि उत्तरांचल यांना सहभागी होऊ द्यायचे नव्हते, तर त्यांना अर्ज पाठवायचा नव्हता. कोणत्या तरी गोष्टींचा आकस काढण्याचा हा प्रयत्न आहे. राज्य संघटनांना आयत्या वेळी पेचात पकडण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे या साऱ्या क्लेशदायक प्रकरणामुळे स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत चार राज्य संघटना आहेत, याबाबतचा अंतिम निर्णय सोमवारी घेण्यात येईल.’’
हे सारे प्रकरण पाहता राजकारणामुळे पुन्हा एकदा खेळाचा आणि खेळाडूंचा बळी जाईल, अशी चिन्हे आहेत. जर एआयसीएफ आणि राज्य संघटना यांनी याप्रकरणी सुवर्णमध्य काढला नाही, तर हे प्रकरण विकोपाला जाण्याची चिन्हे असून, दोन्ही गटांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी खेळ आणि खेळाडूंचा विचार करावा, अशी इच्छा सामान्य कॅरमप्रेमींच्या मनात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 2:16 am

Web Title: some state may bycott on senior national carrom compitition
टॅग : Sports
Next Stories
1 सचिनचे शतक हुकले
2 चैन्नईच्या मैदानात धोनीची धूम
3 सूर तेच छेडिता!
Just Now!
X