काही दिवस, काही तारखा हे अमरत्वाचे वरदान घेऊन जन्माला येतात. अशीच एक तारीख म्हणजे २४ एप्रिल १९७३. क्रिकेटच्या दुनियेतील महामेरू सचिन रमेश तेंडुलकरचा जन्म याच दिवशी झाला. त्यामुळे भारताच्या दृष्टीने जशी ही तारीख महत्त्वाची तशीच सचिनच्या दृष्टीनेही २४ फेब्रुवारी ही तारीख खास आहे. १९८८ मध्ये याच दिवशी गाइल्स चषक शालेय क्रिकेट स्पध्रेत सचिन नावाचा तारा सर्वप्रथम तेजाने तळपला. त्यानंतर २०१० मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुर्मीळ असलेले पहिले द्विशतक सचिनच्या बॅटमधून याच दिवशी साकारले. आता सचिनच्या खात्यावर ५१ कसोटी शतकांसह एकंदर शंभर शतके जमा आहेत. शनिवारी ७१ धावांवर खेळत असलेला सचिन या २४ फेब्रुवारीच्याच मुहूर्तावर आपले शतक क्रमांक १०१वे झळकावेल, हीच क्रिकेटरसिकांची अपेक्षा आहे.
२४ फेब्रुवारी १९८८
आझाद मैदानावर २३ ते २५ फेब्रुवारी १९८८ या कालावधीत सेंट झेवियर्स विरुद्ध शारदाश्रम विद्यामंदिर हा शालेय क्रिकेट स्पध्रेतील सामना भारतीय क्रिकेटसाठी फार मोलाचा ठरला. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी ६६४ धावांची ऐतिहासिक भागीदारी रचून शारदाश्रमला २ बाद ७४८ अशी धावसंख्या उभारून दिली होती. सचिनने नाबाद ३२६, तर विनोद कांबळीने नाबाद ३४९ धावा केल्या होत्या. त्या घटनेला रविवारी २५ वष्रे पूर्ण होत आहे. सचिन आणि विनोदची क्रिकेटजगताने सर्वप्रथम दखल त्याच वेळी घेतली.

२४ फेब्रुवारी २०१०
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या द्विशतकासाठी साऱ्या क्रिकेटप्रेमींना तब्बल चाळीस वष्रे प्रतीक्षा करावी लागली. अखेर इतिहासाशी नाते सांगणाऱ्या ग्वाल्हेर शहरात हा अध्याय लिहिला तो सचिन तेंडुलकरने. दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेन, वेन पार्नेल, जॅक कॅलिस यांसारख्या गोलंदाजीतील अव्वल माऱ्याला न जुमानता सचिनने १४७ चेंडूंत २५ चौकार आणि ३ षटकारांची चौफेर आतषबाजी करीत नाबाद २०० धावांची अजरामर खेळी साकारली होती. त्यानंतर ८ डिसेंबर २०११ या दिवशी वीरेंद्र सेहवागने हा विक्रम मोडीत काढत २१९ धावा केल्या.

२४ फेब्रुवारी २००२
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सचिनने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात १७६ धावांची शतकी खेळी साकारली होती. त्यामुळे भारताला ७ बाद ५७० धावसंख्येवर डाव घोषित करता आला होता.

२४ एप्रिल १९९८
शारजात २४ एप्रिल १९९८ या दिनी म्हणजेच सचिनच्या वाढदिवशी ऑस्ट्रेलियाशीच कोका-कोला चषक क्रिकेट स्पध्रेचा अंतिम मुकाबला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल २७३ धावांचे आव्हान उभे केले, तेव्हा भारत काय हा सामना जिंकणार नाही असेच वाटत होते, पण मैदानावर सचिन नामक वादळ पुन्हा घोंगावले. १३४ धावांची आणखी एक तडाखेबाज खेळी साकारत सचिनने भारताला जेतेपद जिंकून दिले. आपल्या २५व्या वाढदिवसाची भेट म्हणून सचिनने हे शतक पत्नी अंजलीला समर्पित केले. या खेळीत सचिनने क्रॉस्प्रोविझला मारलेला षटकार स्टेडियमच्या छतावर गेला, तेव्हा समालोचक टोनी ग्रेग अवाक् झाले. ‘‘ही वामनमूर्ती व्यक्ती आपल्या खेळीतून साक्षात डॉन ब्रॅडमनची आठवण करते,’’ असे ते म्हणाले होते.