18 February 2019

News Flash

लोअर परळच्या चाळीतून ‘आशियाई’च्या मैदानात!

विष्णू शिंगटे यांनी सुरुवातीला ज्या लोअर परळ रेल्वे कार्यशाळेबाहेर चहाची टपरी सुरू केली होती,

जकार्ता येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघात सोनालीची निवड

भारतीय कबड्डी संघात निवड झालेल्या सोनालीची कहाणी

मुंबई : लोअर परळ, ना. म. जोशी श्रमिक जिमखान्याच्या प्रवेशद्वाराशेजारची जुनी हरहरवाला चाळ. तेथील दहा बाय दहाच्या खोल्या, सततच्या पावसाचा मारा खात उभ्या असलेल्या. त्यातल्याच एका भाडय़ाच्या खोलीवर सध्या आणखी एक वर्षांव सुरू आहे.. अभिनंदनाचा, कौतुकाचा. कारण तेथे राहते सोनाली- राष्ट्रीय कबड्डीपटू सोनाली शिंगटे.

जकार्ता येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघात सोनालीची निवड झाल्याची बातमी शनिवारी आली. तेव्हापासून तिचे ते साधेसे घर उजळून गेले आहे. सोनालीचे वडील विष्णू सुरक्षारक्षकाची नोकरी करतात. आई अपंग. ती खानावळ चालवते. एकूण परिस्थिती बेताचीच. २९ वर्षांपूर्वी ते कोल्हापुरातल्या सावतवाडीहून मुंबईला आले, पोट भरण्यासाठी. त्याकरिता नाना उद्योग केले त्यांनी. चहाचा स्टॉल टाकला. त्यातून भागेना म्हणून सोनालीची आई साखरू यांनी खानावळ सुरू केली; पण त्याही परिस्थितीत त्यांनी सोनालीला शिकवले.

विष्णू शिंगटे यांनी सुरुवातीला ज्या लोअर परळ रेल्वे कार्यशाळेबाहेर चहाची टपरी सुरू केली होती, त्याच रेल्वेमध्ये दोन वर्षांपूर्वी सोनालीला नोकरी लागली.

सोनालीची आई सांगते, ‘‘तो काळ अत्यंत कठीण होता; पण आम्ही हिमतीने घर चालवले. सोनालीला नोकरी लागल्यापासून आता थोडे बरे दिवस आले आहेत. भारतीय संघात तिचे निवड होणे, हा तर आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे.’’

आयुष्याशी कबड्डी सुरू असताना सोनाली प्रत्यक्ष कबड्डीच्या मैदानाकडे कशी वळली? ती म्हणाली, ‘‘बालमोहनमध्ये होते मी, पण तेव्हा कबड्डीकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. बारावीची परीक्षा दिल्यानंतर सुटी सुरू झाल्यावर घराला आर्थिक साहाय्य करण्यासाठी नोकरी पत्करली आणि कबड्डी खेळायचे ठरवले. हौस तर होतीच, पण या खेळात प्रावीण्य दाखवल्यास पोलिसात नोकरी मिळते, हे ऐकून होते. पुढे राजेश पाडावे यांच्या मार्गदर्शनामुळे या खेळाकडे मी व्यावसायिकपणे पाहू लागले. सुवर्णा बारटक्के, गौरी वाडेकर, रक्षा नारकर यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंमुळे जीवनात ध्येय ठेवायला शिकले. रेल्वेत अशोक सुवर्णा आणि गौतमी राऊत यांचे मार्गदर्शन मिळते आहे.’’

मुंबईत नावलौकिक असलेल्या शिवशक्ती महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना सोनालीने महर्षी दयानंद महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्या वेळी देना बँकेच्या कबड्डीच्या शिष्यवृत्तीची फार मदत झाल्याचे ती सांगते. कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे एकदा प्रतिनिधित्व केल्यानंतर गेली दोन वर्षे ती राष्ट्रीय स्पर्धेत रेल्वेकडून खेळते आहे.

‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत सुवर्णपदकावर मक्तेदारी प्रस्थापित केली आहे. ही शान कायम ठेवणारी कामगिरी यंदासुद्धा दाखवू,’’ असा निर्धार सोनालीने प्रकट केला.

कबड्डीतूनच स्वप्नपूर्ती!

‘‘भिवंडीत २०१६ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू म्हणून स्कूटी मिळाली होती. तो क्षण अजूनही माझ्या मनात ताजा आहे. त्याच वर्षी नोकरीसुद्धा मिळाली. कबड्डी हा खेळ माझी स्वप्ने पूर्ण करू शकतो, हे त्या वेळी माझ्या चांगलेच लक्षात आले. आज या छोटय़ाशा घरात बक्षिसांचे चषक ठेवायलाही पुरेशी जागा नाही; पण मला विश्वास आहे, की लवकरच स्वत:च्या कुटुंबाच्या मालकीच्या घराचे स्वप्नही ही कबड्डी पुरी करेल.’’ हे सांगताना सोनालीच्या चेहऱ्यावर खेळाबद्दलचे प्रेम आणि विश्वास दोन्हीही झळकत होते.

First Published on July 11, 2018 1:19 am

Web Title: sonali shingate selection in kabaddi team for asian games