भारताच्या सोनिया लाथेरला (५७ किलो) एआयबीए महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पध्रेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अव्वल मानांकित इटलीच्या अ‍ॅलेसिया मेसिअ‍ॅनोने तिच्यावर २-१ असा संघर्षमय विजय मिळवला. या स्पध्रेत भारताला फक्त सोनियाने पदक मिळवून दिले आहे.
हरयाणाच्या २४ वर्षीय सोनियाने पहिल्या फेरीत आत्मविश्वासाने खेळ करताना मेसिअ‍ॅनोवर विजय मिळवला, परंतु इटलीच्या या खेळाडूने पुनरागमन करताना पुढील तीन फेरीत वर्चस्व गाजवले. गतवर्षी मेसिअ‍ॅनोला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यात सुधारणा करत मेसिअ‍ॅनोने सुवर्णपदकावर कब्जा केला.
२०१०मध्ये भारताने या स्पध्रेत अखेरचे सुवर्णपदक पटकावले होते. एम सी मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात पाचवे जागतिक सुवर्ण जिंकले होते. मात्र यंदा मेरी कोमला (५१ किलो) दुसऱ्या फेरीतच पराभव पत्करावा लागला.