माजी आशियाई रौप्यपदक विजेत्या सोनिया लाथेर (५७ किलो) या एकमेव भारतीय खेळाडूने उपांत्य फेरी गाठून एआयबीए महिला विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पध्रेत पदक निश्चित केले आहे. अन्य चार भारतीय खेळाडूंची आव्हाने उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आली आहेत.

रिओ ऑलिम्पिकसाठीच्या ५१ किलो, ६० किलो आणि ७५ किलो या तिन्ही वजनी गटांतून एकाही खेळाडूला पात्र होता आलेले नाही. सोनियाने पोलंडच्या अ‍ॅनेटा रिगीलस्कावर ३-० असा एकतर्फी विजय मिळवला. सोनियाने सावध, आक्रमक आणि उत्तम पदलालित्याचा खेळ केला. पहिल्या दोन फेऱ्यांमध्येच सोनियाने अ‍ॅनेटावर आपले वर्चस्व सिद्ध केले. अखेरच्या दोन फेऱ्यांमध्ये अ‍ॅनेटा झगडताना आढळली. उपांत्य फेरीत आता सोनियाची इटलीच्या अ‍ॅलेसिया मेसिआनोशी गाठ पडणार आहे. अ‍ॅलिसियाने रशियाच्या व्हिक्टोरिया केलेशोव्हाचा २-० असा पराभव केला.

बिगरऑलिम्पिक गटांमधून गतरौप्यपदक विजेती सर्जुबाला देवी (४८ किलो), माजी कनिष्ठ विजेती निखात झरिन (४८ किलो), सविती (८१ किलो) आणि सीमा पुनिया (+८१ किलो) यांचे पराभव झाले आहेत. कझाकस्तानच्या नझीम कायझयबेने सर्जूबालाचा पराभव केला.  चीनच्या प्यावप्याव लिऊने झरिनचा ३-० असा धुव्वा उडवला. टकीच्या एलिफ गुणेरीने सवितीला ३-० असे हरवले, तर कझाकस्तानच्या लज्जत कुणगेबायेव्हाने सीमाला ३-० अशा फरकाने नामोहरम केले.