भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याचं आत्मचरित्र, ‘Playing It My Way’ हे आता संक्षिप्त स्वरुपात पुन्हा एकदा वाचकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यंदा या आत्मचरित्राची एक खासियत आहे. सचिनचं हे पुस्तक आता कॉमिकच्या स्वरुपात बाजारात येणार आहे. लहान वयोगटातील मुलांवर लक्ष्य केंद्रीत करुन ‘Hatchett India’ या प्रकाशन संस्थेने हा अनोखा उपक्रम आपल्या हाती घेतला आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त प्रसारित केलं आहे.

गॅझेटच्या जमान्यात आजही लहान मुलांमध्ये कॉमिकची क्रेझ कायम आहे. याचाच वापर करत सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीतले काही महत्वाचे क्षण कॉमिकच्या माध्यमातून समोर आणले जाणार आहेत. यात १९९८ साली शारजात खेळलेल्या वादळी खेळीचाही समावेश असल्याचं कळतंय. सध्या या पुस्तकावर काम सुरु असून लहान मुलांना हे पुस्तक खूप आवडेल असं, ‘Hatchett India’ च्या थॉमस अब्राहम यांनी म्हणलं.

अवश्य वाचा – सचिनच्या मुलांचं बोगस अकाऊंट ट्विटरने हटवले, सचिनच्या नाराजीनंतर तात्काळ कारवाई

येत्या आठवड्याभरात सचिनच्या आत्मचरित्राचं हे कॉमिक बाजारात येणार असून, याला लहान वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा आत्मविश्वास प्रकाशकांनी व्यक्त केलाय. याचसोबत मुळ आत्मचरित्रापेक्षा या कॉमिकची किंमत अत्यंत कमी असल्याने या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा थॉमस अब्राहम यांनी व्यक्त केली आहे. या कॉमिकची विक्री सुरु होण्याआधीच १ लाख ५० हजार प्रति लोकांनी आधीच बुक करुन ठेवल्या असल्याचा दावा प्रकाशन संस्थेने केलाय. २०१४ साली सचिनचं आत्मचरित्र ‘Playing It My Way’ बाजारात आलं होतं, या आत्मचरित्राच्या तब्बल १ लाख ३० हजारांपेक्षा जास्त प्रति विकल्या गेल्या होत्या. मैदानाप्रमाणेच सचिनच्या या आत्मचरित्राने विक्रीच्या बाबतीत स्टिव्ह जॉब्सच्या आत्मचरित्राचा विक्रमही मोडला होता.