भारतीय संघानं केलेल्या जिगारबाज खेळीमुळे सिडनी कसोटी सामना अनिर्णीत राहिला. पण या कसोटी सामन्यात सिराज आणि बुमराह यांना वर्णद्वेषीचा सामना करावा लागला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना चाहत्यांनी त्यांच्याविषयी वर्णद्वेषी टिपण्णी केल्याचा प्रकार घडला. या प्रकारावर सर्व आजी-माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्येच आता ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नर यानेही आपलं मत व्यक्त केलं आहे. झालेल्या या प्रकाराबद्दल वॉर्नरनं सामन्यानंतर इन्स्टाग्राम पोस्ट लिहून टीम इंडिया आणि मोहम्मद सिराजची माफी मागितली आहे. तर आपल्या प्रेक्षकांना सुनावलं आहे.

क्रिकेटमध्ये वर्णद्वेषी टीकेला कोणत्याही प्रकारचं स्थान नाही. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी अशा प्रकारचं कृत्य करु नये, असं आवाहन आपल्या पोस्टमध्ये डेव्हिड वार्नर यानं केले आहे. डेव्हिड वॉर्नरनं तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये प्रेक्षकांकडून घडलेल्या प्रकरणावर माफी मागितली आहे. इन्स्टाग्राम पोस्ट लिहून टीम इंडियाची माफी मागताना मोहम्मद सिराजची देखील माफी मागतली आहे. वॉर्नरशिवाय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यानेही प्रेक्षकांकडून करण्यात आलेल्या वर्णद्वेषी टिपणीबद्दल माफी मागितली.

वॉर्नरची इन्स्टाग्राम पोस्ट –

चार कसोटी सामन्याची बॉर्डर-गावसकर मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. १५ जानेवारीपासून अखेरचा सामना होणार आहे.  ब्रिस्बेन येथे होणारा अखेरचा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याच्या इराद्यानं दोन्ही संघ मैदानात उतरतील. भारतीय संघ आघाडीच्या खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे त्रस्त आहे.