विवाहाचे आश्वासन देऊन आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका १८ वर्षीय युवतीने राष्ट्रीय टेबल टेनिसपटू सौम्यजित घोषवर केला असून, पश्चिम बंगाल पोलीस त्या बाबतचा तपास करीत आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र घोषने या आरोपांचे खंडन करीत आपल्याला ‘ब्लॅकमेल’ केले जात असल्याचा खुलासा केला आहे.

पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्हय़ातील बारासत महिला पोलीस ठाण्यात घोष याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर घोष याच्याविरुद्ध बलात्कार, फौजदारी स्वरूपाचा कट, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोषविरुद्ध बुधवारी आमच्याकडे तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. तपास नुकताच सुरू झाला असल्याने सध्या त्या बाबत काहीही सांगता येणार नाही, असे बारासतचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित बॅनर्जी यांनी सांगितले.

सदर युवती बारासत जिल्हय़ातील असून तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, विवाहाचे आश्वासन देऊन घोष याने गेल्या तीन वर्षांपासून अनेक वेळा आपल्यावर बलात्कार केला. इतकेच नव्हे तर घोष याने दक्षिण कोलकातामधील बाघा जतीन फ्लॅटवर आपल्याला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले, असेही तक्रारीत म्हटले आहे. आमची २०१४मध्ये समाजमाध्यमावर भेट झाली आणि आपण १८ वर्षांचे झाल्यानंतर विवाह करण्याचे आश्वासन घोषने आपल्याला दिले होते, असेही तक्रारीत म्हटले आहे.

आपल्याला हेतूपूर्वक गोवण्यात आले -घोष

घोषने या आरोपांचे खंडन केले आहे. तो म्हणाला, ‘‘ही युवती पूर्वी माझी प्रेयसी होती. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. आम्ही बऱ्याच ठिकाणी एकत्रित हिंडलो आहोत. मात्र मला खेळात कारकीर्द घडवायची असल्यामुळे आम्ही एकमेकांपासून फारकत घेतली. त्यानंतर आम्ही वेगळे झाल्यानंतर मला बदनाम करण्यासाठी तिने हे कुंभाड रचले आहे. केवळ मला एकटय़ाला नव्हे तर माझे कुटुंबीय व माझ्या मित्रांनाही बदनाम करण्याचा तिच्याकडून सतत उद्योग सुरू आहे. तिच्यामुळे माझ्या खेळातील कारकीर्द उद्ध्वस्त होणार आहे. मला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्या वेळी तिच्यासह तिच्या परिवारातील अनेक जण या समारंभास उपस्थित होते. मला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तिच्या आईने मला कोलकाता शहराबाहेर असलेला एक भूखंडही भेट म्हणून दिला होता. मी व ती युवती आमच्या दोघांचे नावही या भूखंडाच्या सातबारा उताऱ्यावर लावण्यात आले आहे. तिचे वडील कोलकाता येथील रुग्णालयात असताना मी ५० हजार रुपयांची मदतही केली होती.’’

आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाचे सराव शिबिर जर्मनीत सुरू असून तेथे घोष सहभागी झाला आहे. भारतीय टेबल टेनिस महासंघाने घोषला राष्ट्रकुल संघातून वगळण्यात येण्याची शक्यता असल्याचे सांगितले असले तरी अद्याप आपल्याला तसा कोणताही संदेश आलेला नाही. मी निदरेष आहे त्यामुळे मी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहे, असेही घोषने सांगितले.