आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस क्षेत्रात एक ऐतिहासिक अध्याय रविवारी लिहिला गेला. सांतोस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या जागतिक ब्राझील खुल्या टेबल टेनिस स्पध्रेत सौम्यजित घोष आणि मनिका बत्रा यांनी विजेतेपद पटकावले.
२१ वर्षांखालील पुरुषांच्या गटात घोषने फ्रान्सच्या बेंजामिन ब्रोस्सियरचा ८-११, ६-११, ११-७, ११-६, ९-११, ११-७, ११-२ असा पराभव केला, तर मनिकाने ब्राझिलच्या कॅरोलिन कुमाहाराला ११-५, ९-११, १२-१०, ११-५, ११-५ अशा फरकाने पराभूत केले. दोन्ही विजेत्यांना दीड हजार अमेरिकन डॉलर्सचे इनाम मिळाले.
दरम्यान, सागरिका घोषने कॅडेट मुलींमधील एकेरीचे जेतेपद जिंकले, तर बिर्डी बोरोला कॅडेट मुलांमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. नुकतेच दक्षिण आशियाई कनिष्ठ गटाचे जेतेपद पटकावणाऱ्या सागरिकाने श्रीजाचा ११-६, ११-५, ११-८ अशा फरकाने पराभव केला, तर क्युबाच्या लिव्हान मार्टिनेझकडून बोरोने ११-९, ११-८, ११-५ असा पराभव पत्करला.

मी कमावलेले महत्त्वाचे गुण माझ्यासाठी सहाव्या गेममध्ये उपयुक्त ठरले. त्यामुळेच मी हा सामना सहजपणे जिंकू शकलो.
सौम्यजित घोष

मी कॅरोलिनविरुद्ध याआधीसुद्धा खेळले होते. त्यामुळे मी आत्मविश्वासाने खेळाला प्रारंभ केला. प्रतिस्पर्धी अतिशय खंबीर आक्रमक खेळाडू असल्यामुळे मी संयमी आणि धिम्या गतीने खेळ केला.
मनिका बत्रा