दुखापतींमुळे कारकीर्दीत संघर्ष करावा लागणारा सौरभ वर्मा हा वरिष्ठ राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यासाठी उत्सुक झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आत्मविश्वास उंचावण्यासाठी हे विजेतेपद उपयोगी होईल असे त्याचे मत आहे.
सौरभ याने सांगितले, ‘‘दुखापतींमुळे मला अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळेच माझ्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा महत्त्वाची आहे. या स्पर्धेत सर्वोच्च यश मिळविण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविणे हेदेखील आव्हानच असते. तेथेही अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू भाग घेत असतात. साहजिकच प्रत्येक सामन्यात विजय मिळविण्यासाठी झुंजावे लागते.’’
‘‘इंडियन ओपन स्पर्धेत मला संधी मिळाली होती. तेथे मी अव्वल यश मिळवू शकलो नाही तरी तेथील माझी कामगिरी समाधानकारक होती. आता मी थायलंड ओपन व व्हिएतनाम चॅलेंजर्स स्पर्धेत भाग घेणार आहे,’’ असे सौरभ याने सांगितले.
सौरभ याने २०११ मध्ये सईद मोदी ग्रां.प्रि. स्पर्धा व २०१४ मध्ये मलेशियन ओपन स्पर्धा या स्पर्धामध्ये अंतिम फेरी गाठली होती मात्र अपेक्षेइतकी लढत तो देऊ शकला नव्हता. तो म्हणाला, ‘‘२०१४ मध्ये मला डिसेंबर महिन्यात कोपर व गुडघ्याच्या दुखापतींना सामोरे जावे लागले होते. या दोन्ही दुखापतींमुळे मला अनेक महिने स्पर्धात्मक सरावापासून वंचित राहावे लागले. दुखापतीमधून पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ताकदीत मी कमी पडतो असे माझ्या लक्षात आल्यानंतर मी ताकद वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.’’

तन्वी उपांत्यपूर्व फेरीत
चंदिगढ : चंदिगढ येथे सुरू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल मानांकित तन्वी लाडने उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. शुक्रवारी झालेल्या पहिल्या लढतीत तन्वीने कुहु गर्गवर विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत तिने वैष्णवी भालेवर २१-१६, २१-१४ अशी मात केली. पी.सी. तुलसीने श्रेयंशी परदेशीवर २१-१०, २१-१४ असा विजय मिळवला. नेहा पंडितने रितुपर्णा दासला २१-१७, १६-२१, २१-२ असे नमवले. रसिका राजेने साई उत्तेजिता रावचा २१-१४, २१-११ असा पराभव केला. रेवती देवस्थळेने श्री कृष्णा प्रियावर १९-२१, २१-७, २१-९ असा विजय मिळवला. पुरुषांमध्ये सौरभ वर्माने आनंद पवारवर २३-२१, २१-१९ अशी मात केली. समीर वर्माने सिरील वर्माचे आव्हान २१-१८, २१-१८ असे संपुष्टात आणले.