भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटूंपैकी एक असलेल्या सौरभ वर्माची बॅग प्रवासादरम्यान तुटल्याने त्याने एअर इंडियाच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. दिल्ली ते कोपनहेगन या प्रवासात बॅगेतील सामानाचे नुकसान झाल्यानंतर त्याने रीतसर तक्रार नोंदवली होती. मात्र त्यानंतरही त्याला कोणतीही नुकसानभरपाई मिळाली नसल्याने त्याने समाजमाध्यमांद्वारे एअर इंडियावर आगपाखड केली आहे.

‘‘गेल्या आठवडय़ात मला एअर इंडियाकडून मिळालेल्या सेवेने मी खरोखरच निराश झालो आहे. मी दिल्लीहून कोपनहेगनला गेल्यावर बॅगेतील सामान उघडून पाहण्याआधीच मला मोठा धक्का बसला. माझ्या बॅगेचेच नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मी कोणताही वेळ वाया न घालवता तक्रार नोंदवली. तसेच त्याचे फोटोदेखील संबंधितांना मेल केले. मात्र, त्या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. माझी तक्रार करून २० दिवस झाल्यानंतरही मला कोणतीही भरपाई मिळालेली नाही,’’ असे सौरभ वर्माने सांगितले.

‘‘बॅडमिंटनपटू असल्याने सातत्याने विदेश दौरे करीत असतो. त्यामुळे या प्रकरणी लक्ष घालून समस्येचे निराकरण करावे,’’ असेही सौरभने आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. गतवर्षीच्या रशियन खुल्या आणि डच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलेल्या सौरभने या प्रकरणाचा एअर इंडियाने लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावावा, असेही म्हटले आहे.