भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी निवड होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली यांच्या नावाची चर्चा होती. मात्र सोमवारी केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे आता गांगुली BCCI चे अध्यक्षपद भूषवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय २३ ऑक्टोबरला BCCI च्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात येणार आहे.

BCCI चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गांगुलीला टीम इंडियाकडून काय अपेक्षा आहे याबाद्दल गांगुलीने स्पष्ट केले. “भारतीय संघाने ICC आयोजित करत असलेल्या मोठ्या स्पर्धांचे विजेतेपद मिळवण्यावर लक्ष द्यावे. प्रत्येक स्पर्धा जिंकणे शक्य नसते हे मला मान्य आहे, पण ICC ने आयोजित केलेल्या गेल्या ७ स्पर्धा टीम इंडियाला जिंकता आलेल्या नाहीत. टीम इंडियाकडे प्रतिभा आहे. ते जशी कामगिरी करत आहेत, त्यापेक्षा खूप चांगली कामगिरी करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. टीम इंडियातील खेळाडू अत्यंत गुणवान आहेत. विश्वचषक स्पर्धेतही टीम इंडियाने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती हे आपल्याला विसरता येणार नाही. फक्त शेवटपर्यंत पोहोचल्यावर ती स्पर्धा न जिंकत येणे ही सध्या टीम इंडियाची खरी समस्या आहे. त्याकडे विराटने लक्ष द्यायला हवे. कारण अशा स्पर्धा मैदानावरच जिंकाव्या लागतात. त्यासाठी बैठकीतील चर्चा पुरेशी नसते”, असे गांगुलीने स्पष्ट केले.

दरम्यान, गांगुलीने विराटचे कौतुकदेखील केले. पुढील वर्षी भारतात टी २० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारताकडून खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आतापासूनच सर्वोत्तम संघ कसा असावा, याची चाचपणी सुरू आहे. भारताला विराटसारखा एक चांगला आणि निर्भिड कर्णधार लाभला आहे. तो भारताची शान, गौरव आणि अभिमान आहे. विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत कोणताही दबाव बाळगू नये. त्याने मनासारखे खेळावे. कारण सामना बैठकीत नाही, तर मैदानात जिंकला जातो, असे म्हणत गांगुलीने विराटचा स्तुती केली आणि त्याला BCCI चा पूर्णपणे पाठिंबा असेल, असे संकेत दिले.