विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला रोहित शर्माने आशिया चषकात विजय मिळवून दिला. यानंतर ४ ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माला संघात जागा मिळेल असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता. मात्र निवड समितीने यंदाही रोहितचा कसोटी क्रिकेटसाठी विचार केलेला नाहीये. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल यांना संघात जागा मिळालेली असली, तरीही करुण नायरला संघातून वगळल्यामुळे नेटीझन्सनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली व हरभजन सिंग यांनीही रोहितला वगळण्याच्या निर्णयावरुन आश्चर्य व्यक्त केलं आहे.

निवड समितीचे सदस्य नेमका काय विचार करतायत? कोणाला समजलं तर मलाही सांगा, अशा शब्दांमध्ये हरभजनने रोहितला वगळण्याच्या निर्णयावर आपलं मत मांडलं आहे. दुसरीकडे सौरव गांगुलीनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर, रोहितला वगळण्याच्या निर्णयावर टोला लगावला आहे.

२०१८ साली जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर रोहितला कसोटी संघात आपली जागा राखता आलेली नाहीये. वन-डे क्रिकेटमध्ये मात्र रोहित शर्मा आश्वासक आणि आक्रमक फलंदाजी करतो आहे. मात्र वन-डे संघातली त्याची ही कामगिरी कसोटी संघात त्याला जागा मिळवून देत नाहीये. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेत रोहितला संघात जागा मिळते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.