स्फोटक फलंदाजीने क्रिकेटचे मैदान गाजविणारा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता फुटबॉलच्या मैदानावरही दिसणार आहे. आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील कोलकाता संघाचे हक्क मिळवण्यासाठी गांगुली आणि स्पॅनिश लीगमधील अव्वल संघ अ‍ॅटेलटिको माद्रिद एकत्र आले आहेत.
स्पॅनिश लीगमध्ये अ‍ॅटेलटिको माद्रिद सध्या बार्सिलोना आणि रिअल माद्रिदला मागे टाकून अव्वल स्थानी आहे. सुरुवातीला या क्लबने स्वतंत्रपणे फ्रँचायजी घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र नंतर त्यांनी गांगुलीसमवेत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला.
बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमने शिलाँग लजाँग क्लबबरोबर या स्पर्धेसाठी भागीदारी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. दार्जिलिंग येथून लोकसभा निवडणूक लढवत असलेला भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायच्युंग भूतियानेही लजाँग क्लबबरोबर भागीदारी केल्याचे समजते.
कोची फ्रँचायजीकरिता क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भागीदारी करण्याची तयारी दर्शवल्याचे समजते. दिल्ली फ्रँचायजीकरिता शाहरुख खान उत्सुक असल्याचे समजते.