भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी निवड होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली यांच्या नावाची चर्चा होती. मात्र सोमवारी केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे आता गांगुली BCCI चे अध्यक्षपद भूषवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांची सचिवपदी, तर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होणेही जवळपास निश्चित आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय २३ ऑक्टोबरला BCCI च्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात येणार आहे.

सौरव गांगुली हा BCCI च्या अध्यक्षपदापासून केवळ एका घोषणेच्या अंतरावर आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरूवात केली आहे. भारताचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याला शुभेच्छा दिल्या. “सौरव आणि मी एकत्र खेळलेलो आहोत. त्याचा खेळ मी पाहिला आहे. ज्या पद्धतीचे क्रिकेट सौरवने खेळले किंवा ज्या पद्धतीने त्याने स्वत: पुढे येत भारतीय संघाला सावरले, त्यावरून ‘दादा’ BCCI चा कारभारदेखील समर्थपणे चालवेल अशी मला खात्री आहे. BCCI च्या अध्यक्षपदाचा कारभार हाती घेतल्यावर तो त्याची जबाबदारी त्याच जिद्दीने आणि यशस्वीरित्या पार पाडेल”, असा विश्वास सचिनने गांगुलीबद्दल व्यक्त केला.

दरम्यान, BCCI ची २३ ऑक्टोबरला होणारी वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठी रविवारी विविध राज्य संघटनांची अनौपचारिक बैठक मुंबईत झाली. त्यात अध्यक्षपदासाठी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या नावाची चर्चा होती. BCCI च्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. या मुदतीत केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांना कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याने त्याचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुपर ओव्हर टाय झाल्यास ‘हा’ उपाय सगळ्यात भारी – सचिन

या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी करून वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी १५ ऑक्टोबरला BCCI कडून जाहीर केली जाईल. तर १६ तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दिली जाईल. त्यानंतर २३ ऑक्टोबरला निवडणूक पार पडून नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात येणार आहे.