भारताचा माजी कर्णधार आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार सौरव गांगुलीविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लवाद अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (सीएबी) अध्यक्षपद सांभाळत असतानाही गांगुलीने दिल्लीच्या सल्लागाराची भूमिका स्वीकारली असल्याने बंगालच्या दोन क्रिकेटप्रेमींनी ही तक्रार नोंदवली आहे. १२ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे होणाऱ्या सामन्यात गांगुली दोन्ही पदांच्या भूमिका कशा सांभाळू शकतो, याविषयी लवाद अधिकारी डी के जैन यांच्याकडे रणजीत सिल व भासवती शांतुआ यांनी तक्रार नोंदवली आहे. त्याशिवाय हे नैतिक मूल्यांच्या विरुद्ध असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

‘‘१२ एप्रिलला ईडन गार्डन्स येथे होणाऱ्या दिल्ली विरुद्ध कोलकाता यांच्यातील सामन्यात कोलकाता स्थानिक संघ असल्याने ते सीएबीशी संलग्न आहेत. गांगुली सीएबीचा अध्यक्ष असल्याने तो या सामन्यात दिल्लीचे सल्लागारपद कसे काय सांभाळू शकतो,’’ असे सीलने पत्राद्वारे जैन यांना कळवले.दरम्यान, गांगुलीकडून याविषयी काहीही प्रतिक्रिया मिळाली नाही. मात्र गांगुलीच्या निकटच्या व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार गांगुलीने प्रशासकीय समितीची परवानगी घेऊनच दिल्लीचे सल्लागारपद स्वीकारले असल्याचे समजते.