बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने करोना विरुद्ध लढ्यात आपला सक्रीय सहभाग नोंदवला आहे. गांगुलीने कोलकात्यातील गरजू व्यक्तीसांठी दोन हजार किलो तांदूळ दान केले आहेत. कोलकात्यातील बेलूर मठ परिसरात जाऊन सौरवने ही मदत केली आहे. सौरव गांगुलीने आपल्या या मदतकार्याचे फोटो ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

सध्याच्या खडतर परिस्थितीत आमच्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा असेल तर सकराने आम्हाला सांगावं. जे जे गरजेचं आहे ते आम्ही करु, कोणतीही समस्या येणार नाही, अशा शब्दांमध्ये गांगुलीने आपण या खडतर काळात सरकारच्यासोबत असल्याचं सांगितलं. सौरवने काही दिवसांपूर्वी ५० लाख किमतीचे तांदूळ गरजू व्यक्तींमध्ये दान करण्याचं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे गांगुलीप्रमाणे सध्याच्या काळात ज्या नागरिकांना मदत करणं शक्य आहे त्यांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने परिपत्रक जाहीर करत केलं आहे.

करोनाचा फटका बीसीसीआयलाही बसला आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत परदेशातील नागरिकांना भारतात येण्यासाठी बंदी केली होती. आयपीएलचा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ३ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान होण्याचा अंदाज आहे. याचसोबत सर्व संघमालकांनाही १०० कोटींपेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागू शकतं. याचसोबत स्पर्धा रद्द झाल्यास खेळाडूंनाही फटका बसणार आहे. त्यामुळे आगामी काळात बीसीसीआय आयपीएलबद्दल काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.