News Flash

सचिन ओपनिंगला स्ट्राइक घेणं का टाळायचा? गांगुलीनं सांगितलं कारण

सचिनने दिलेलं कारण ऐकून तुम्हीही नक्कीच हसाल

बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला 'प्रिंस ऑफ कोलकाता' म्हणूनही ओळखलं जाते. अनेकजन गांगुलीला बंगाल टायगरही म्हणतात. गांगुलीचा आज वाढदिवस आहे.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही दोन नावं खूप महत्त्वाची आहेत. या दोघांनी १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर नव्या भारतीय संघाला दिशा देण्यात मोलाचा वाटा उचलला. मॅच फिक्सिंगसारख्या संकटातून भारताला वर आणले. भारतीय फलंदाजीची धुरा या दोघांनी समर्थपणे पेलली. सलामीवीर जोडी म्हणून या दोघांनी दमदार कामगिरी केली आणि जगावर अधिराज्य गाजवले. या जोडीने १७६ डावांत ४७.५५ च्या सरासरीने ८,२२७ धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजांच्या जोडीने अद्याप ६,००० धावांचा पल्लाही गाठलेला नाही. याच जोडीतील माजी कर्णधार सौरव गांगुलीने सचिनबद्दल एक धमाल किस्सा सांगितला.

BCCI च्या चॅनेलवरील ओपन नेट्स कार्यक्रमात सलामीवीर मयंक अग्रवाल याने गांगुलीची व्हिडीओ मुलाखत घेतली. त्यात मयंकने गांगुलीला प्रश्न विचारला की आम्ही अनेकदा पाहिलं की सलामीला उतरताना डावाचा पहिला चेंडू सचिन न खेळता तू खेळायचास. याबद्दल काय सांगशील? त्यावर गांगुलीने मजेशीर उत्तर दिले. “सचिन नेहमी मला पहिला चेंडू खेळायला लावायचा हे खरं आहे. त्याला मी काही वेळा म्हणायचो की मीच नेहमी पहिला चेंडू का खेळायचा? कधी तरी तू पण पहिला चेंडू खेळ. त्यावर त्याच्याकडे दोन उत्तर तयार असायची.”

“सचिन जर चांगल्या लयीत असेल, तर त्याचा तो फॉर्म कायम राहावा म्हणून तो नॉन-स्ट्राईकला जाऊन उभा राहायचा. जेव्हा सचिन चांगल्या लयीत नसायचा तेव्हाही त्याच्याकडे उत्तर तयार होतं. तो मला सांगायचा की तू पहिला चेंडू खेळ, कारण माझा फॉर्म फारसा चांगला नाहीये. मी नॉन-स्ट्राईकला उभा राहतो आणि तुझा खेळ पाहतो. म्हणजे माझ्यावरचं दडपण कमी होईल”, असं उत्तर गांगुलीने दिलं. “त्याच्याकडे चांगला आणि वाईट अशा दोन्ही फॉर्मसाठी उत्तर होतं. मग काही वेळा मीच चलाखी करायचो. त्याच्या नकळत मी एक-दोन वेळा पटकन जाऊन नॉन-स्ट्राईकवर उभा राहायचो. त्यामुळे त्या नाईलाजाने पहिला चेंडू खेळावा लागायचा. पण असं एक-दोन वेळाच घडलं”, असंही गांगुलीने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:14 pm

Web Title: sourav ganguly explained why sachin was not taking strike to play first ball in cricket match live video chat vjb 91
Next Stories
1 वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज म्हणतो, “सचिनला गोलंदाजी करणं म्हणजे…”
2 “आता बास झालं… आमचं आम्ही बघतो”; BCCI चा ICC ला इशारा
3 हार्दिकचं विराटला दमदार प्रत्युत्तर, पाहा हा भन्नाट Video
Just Now!
X