गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाचा सर्वात चांगला कर्णधार सौरव गांगुली की महेंद्रसिंह धोनी यावर चर्चा सुरु आहे. अनेकजणं यावर आपली मतं मांडत आहेत. काही जणांच्या मते धोनी हा भारताचा सर्वोत्तम कर्णधार आहे तर काहींच्या मते गांगुलीने खऱ्या अर्थाने आक्रमक भारतीय संघ तयार केला. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू कृष्णमचारी श्रीकांत यांच्यामते सौरव गांगुलीने भारतीय संघ घडवला, धोनीला गांगुलीमुळे विजयी फॉर्म्युला आयता मिळाला…ते Star Sports वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

“आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा आक्रमक चेहरा निर्माण करण्यात गांगुलीचा महत्वाचा वाटा आहे. फार खडतर काळात गांगुली भारतीय संघाचा कर्णधार झाला होता. त्यामुळे संघात बदल घडवण्यापासून, खेळाडूंच्या मानसिकतेत बदल आणि आक्रमक स्वभाव या सर्व गोष्टी देण्यात सौरवचा महत्वाचा वाटा आहे. सौरव गांगुलीने भारतीय संघ घडवला, धोनीला हा विजयी फॉर्म्युला आयता हातात मिळाला”, श्रीकांत यांनी आपलं परखड मत मांडलं.

अवश्य वाचा – वन-डे क्रिकेटमध्ये धोनी गांगुलीपेक्षा चांगला कर्णधार – गौतम गंभीर

याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या गौतम गंभीरने या मुद्द्यावर श्रीकांत यांची री ओढली. “धोनीने विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यासारख्या खेळाडूंचा अपवाद सोडला तर फारसे मॅचविनींग खेळाडू भारतीय संघाला दिले नाहीत. सौरव गांगुलीकडे संघाचं नेतृत्व आलं त्यावेळी सर्व खेळाडू नवखे होते. पण यानंतर गांगुलीच्या नेतृत्वाखाली हरभजन सिंह, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, मोहम्मद कैफ यासारख्या खेळाडूंची कामगिरी पाहिल्यानंतर सौरवने खऱ्या अर्थाने भारताला मॅचविनींग खेळाडू दिले असं म्हणता येईल.”

महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे भारतीय संघाचं नेतृत्व आलेलं आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावलेला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामापासून धोनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. परंतू करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे धोनीचं पुनरागमन लांबणीवर पडलं.