बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने खडतर काळात पुन्हा एकदा आपलं सामाजिक भान राखलं आहे. कोलकात्याच्या इस्कॉन केंद्राला सौरव गांगुली लॉकडाऊन काळात अन्नदानासाठी मदत करणार आहे. सौरव गांगुलीने दहा हजार लोकांच्या जेवणाची जबाबदारी स्विकारली आहे. इस्कॉनच्या कोलकाता केंद्रात दररोज दहा हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते, सौरव गांगुलीच्या मदतकार्यानंतर आता याच केंद्रात २० हजार लोकांना रोजचं जेवण मिळणार आहे.

सौरवने नुकतीच या केंद्राला भेट देऊन अन्नदानासाठी लागणारी सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं. “सध्याचा काळ खडतर आहे, आम्ही दररोज १० हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करत होतो. सौरवने आमच्या केंद्राला भेट देऊन अन्नदानासाठी जी काही मदत लागेल ते पुरवण्याचं आश्वासन दिलंय. यामुळे आम्ही आता दररोज २० हजार लोकांना जेवणं पुरवू शकतो.” कोलकात्याच्या इस्कॉन केंद्राचे प्रवक्ते राधारमण दास यांनी माहिती दिली. याआधी सौरव गांगुलीने बेलूर मठाला मोठ्या प्रमाणात तांदूळ दान केले होते.