News Flash

इंग्लंडविरुद्धची मालिका भारतात आयोजित करायला पहिलं प्राधान्य – सौरव गांगुली

नवीन वर्षात इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर

भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन युएईत केलं. लॉकडाउनपश्चात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली असली तरीही भारतीय संघाने अद्याप आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आयपीएलचा तेरावा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. नवीन वर्षात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी युएई क्रिकेट बोर्डासोबत आयोजनाचा करार करुन ठेवला आहे. तरीही इंग्लंडविरुद्धची मालिका भारतातच आयोजित करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करणार आहे.

“इंग्लंडविरुद्धची मालिका भारतात आयोजित करण्याला आमचं पहिलं प्राधान्य असणार आहे. भारतीय मैदानांवर ही मालिका आम्हाला खेळवायची आहे. युएईत मालिका खेळवायची झाल्यास ३ मैदानं (अबु धाबी, शारजा, दुबई) हा मोठा फायदा आहे. मुंबईतही आपल्याला अशी सुविधा आहे. वानखेडे, सीसीआय आणि डी.वाय.पाटील अशी ३ मैदानं आहेत. कोलकात्यात इडन गार्डन्स मैदान आहे. पण यासाठी आपल्याला Bio Secure Bubble तयार करावं लागेल. भारतात क्रिकेट लवकरात लवकर सुरु करणं हे आमचं उद्दीष्ट असणार आहे. यासाठी करोनाच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.” एका खासगी कार्यक्रमात उपस्थित असताना गांगुलीने माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून वातावरण खूप वेगळं आहे. प्रत्येकाला परिस्थिती पूर्ववत आलेली हवी आहे. क्रिकेट सुरु व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. पण खेळाडू आणि इतर घटकांचा विचार केला असताना करोनाच्या घडामोडींवरही लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं गांगुलीने स्पष्ट केलं. स्थानिक क्रिकेटचा हंगाम सुरु करण्याबाबतही बीसीसीआय सर्व पर्यायांचा विचार करत असल्याचं गांगुलीने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 8:03 pm

Web Title: sourav ganguly hopes to host next years series against england in india psd 91
Next Stories
1 बांगलादेशचा श्रीलंका दौरा पुन्हा एकदा पुढे ढकलला
2 ला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक
3 फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : अझारेंका, हॅलेपची विजयी सलामी
Just Now!
X