दुहेरी हितसंबंधांचा नियम राबवतानाचे धोरण व्यवहार्य हवे. रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट अशा दोन्ही ठिकाणी भूमिका बजावत आहे, त्याचे उदाहरण घेता येईल, असे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सांगितले.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याप्रमाणेच दुहेरी हितसंबंधांप्रकरणी गांगुलीला नोटीस देण्यात आली होती. कारण गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार आहे. महिन्याभरापूर्वी राहुल द्रविड यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नीती अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर गांगुलीने नाराजी प्रकट केली होती.

‘‘नियमातून सूट द्यावी, असे माझे अजिबात म्हणणे नाही. पण ते व्यवहार्य असावे. द्रविड यांची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून आता निवड झाली. परंतु इंडिया सिमेंटमधील नोकरी आधीपासूनच आहे. तीन वर्षांनंतर अकादमीतील पद टिकेल, याची शास्वती नाही. परंतु नोकरी मात्र कायम राहणार आहे,’’ असे गांगुलीने सांगितले.