ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच एकदिवसीय मालिका भारत जिंकेल यात शंका नाही. पण भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्भेळ यश मिळणे कठीण आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले.

‘‘भारताला त्यांच्याच मैदानात पराभूत करणे सोपे नाही. भारत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवेल, पण भारताने जसे श्रीलंकेविरुद्ध निर्भेळ यश मिळवले होते, तशी कामगिरी त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणे सोपे नसेल. कारण ऑस्ट्रेलियाचा संघ चांगलाच तुल्यबळ आहे,’’ असे गांगुली म्हणाला.

संघ निवडीविषयी गांगुली म्हणाला की, ‘‘निवड समिती युवा खेळाडूंकडून कामगिरी कशी होत आहे, हे जोखत आहे. आगामी २०१९चा विश्वचषक डोळ्यांपुढे ठेवून युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय योग्यच आहे. विश्वचषकासाठी संघ निवडण्यासाठी अजून बराच कालावधी आहे. संघ बांधणी करताना प्रत्येक खेळाडूला संधी मिळणे महत्त्वाचे आहे.’’

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला १७ सप्टेंबरपासून चेन्नई येथे सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघ निवडताना युवराज सिंगला संधी देण्यात आली नाही. याबाबत गांगुली म्हणाला की, ‘‘युवराज अजून संपलेला नाही. त्याने जिद्द कायम ठेवली तर तो नक्कीच संघात पुनरागमन करू शकतो.’’

कमिन्सला प्रत्येक सामन्यात खेळवणार -साकेर

चेन्नई : सध्या क्रिकेट जास्त प्रमाणात खेळले जात असले तरी भारताविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आम्ही वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला सर्व सामन्यात खेळवणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचे प्रभारी प्रशिक्षक डेव्हिड साकेर यांनी स्पष्ट केले.

‘‘कमिन्सला प्रत्येक सामन्यात खेळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर त्याला विश्रांती कशी मिळेल, हेदेखील आम्ही पाहणार आहोत. सध्याच्या घडीला क्रिकेट मोठय़ा प्रमाणात खेळले जात आहे, पण आमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण मालिका आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यापेक्षा मोठी मालिका कोणतीही असू शकत नाही. त्यामुळेच कमिन्सला प्रत्येक सामन्यात खेळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’’ असे साकेर यांनी सांगितले.

स्मिथ आणि वॉर्नरसाठी विशेष रणनिती – शमी

कोलकाता : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यासाठी विशेष रणनिती आखली आहे, असे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सांगितले.

‘स्मिथ आणि वॉर्नर यांना झटपट बाद करण्यासाठी आम्ही खास रणनिती आखली आहे. प्रत्येक प्रतिस्पध्र्याविरुद्ध खेळताना नवीन रणनिती आखावी लागते. या रणनितीची योग्य अमंलबजावणी मैदानात व्हायला हवी. घरच्या मैदानात एकदिवसीय सामना खेळायला मिळणे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. या सामन्यात माझ्याकडूचांगली कामगिरी व्हावी आणि संघाच्या विजयाला हातभार लागावा, एवढीच माझी इच्छा असेल,’ असे शमीने सांगितले.