कोलकाता : आक्रमक फलंदाज ऋषभ पंत हा भारताचे भवितव्य असला तरी विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या भारतीय संघातील पंतच्या स्थानाविषयी गांगुली अनभिज्ञ आहे. फक्त तीन एकदिवसीय सामने खेळलेला पंत विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग कसा असू शकतो, असा सवाल करत गांगुलीने त्याच्या स्थानाविषयी आक्षेप घेतला आहे.
ईडन गार्डन्सवर पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाला, ‘‘भविष्यात तो भारतीय संघाचा एक प्रमुख घटक असेल, पण सध्याच्या विश्वचषकात त्याचे स्थान योग्य आहे, असे मला वाटत नाही. दिनेश कार्तिक हा एकदिवसीय संघाचा भाग नसल्यामुळे स्वाभाविकच त्याचा पर्याय म्हणून विचार केला जात नाही. यावरूनच निवड समितीला काय अपेक्षित आहे, याची कल्पना येते.’’
‘‘भारत हा जगातील बलाढय़ संघांपैकी एक आहे. या संघात फारसे बदल करावेत, असे मला वाटत नाही. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार तसेच फिरकीत युजर्वेद्र चहल आणि कुलदीप यादव हे दमदार पर्याय भारताकडे आहेत. तसेच भारताची फलंदाजीही तगडी आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ तगडे आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकून श्रीलंकेनेही आपण विश्वचषकाच्या शर्यतीत असल्याचे दाखवून दिले. मात्र सामन्याच्या दिवशी चांगली कामगिरी करणारा संघच बाजी मारू शकेल,’’ असेही गांगुलीने सांगितले.
लोकेश राहुलने केलेल्या दमदार पुनरागमनाविषयी गांगुली म्हणाला, ‘‘राहुलविषयी मी आशावादी आहे. मात्र चांगली गुणवत्ता असली तरी त्याने परदेशातील खेळपट्टय़ांवरही धावा काढायला हव्यात.’’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 2, 2019 4:16 am