क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. कधी एखादा खेळाडू सहज शतक ठोकून जातो, तर कधीकधी प्रचंड परिश्रम करूनही त्याला चार-पाच डावात धावा करता येत नाहीत. प्रत्येक खेळाडूचा एक वाईट काळ असतो. त्या काळात सहसा त्याला संघातून बाहेर केलं जातं. भारताचा यशस्वी माजी कर्णधार सौरव गांगुली याच्याबाबतही असाच एक प्रकार घडला होता. पण त्या काळात गांगुलीला एका विशिष्ट गोष्टीमुळे आधार मिळाला.

२००५ साली झिम्बाब्वे दौऱ्यावरून संघ परतला आणि गांगुलीला संघातून वगळण्यात आले. प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी तसा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यायला लावला होता. संघातून वगळलं जाणं ही भावना गांगुलीसाठी निराशाजनक होती. पण गांगुलीला त्या काळात आधार मिळाला तो सकारात्मक विचारांचा. एका बंगाली वृत्तपत्राला गांगुलीने मुलाखत दिली. त्यात गांगुली म्हणाला, “संघातून वगळण्यात आल्यावर मी आत्मविश्वास अजिबात कमी होऊ दिला नाही. मी खेळलो तर मी नक्की धावा करेन याची मला खात्री होती. वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, शोएब अख्तर यांची गोलंदाजी माझे प्रशिक्षक खेळले नव्हते. त्यांच्या गोलंदाजीता सामना मी केला होता आणि त्यांची धुलाईदेखील केली होती. मी जर १० वर्षे ही कामगिरी चोख बजावतोय तर मला पुन्हा संधी मिळाल्यावरही मी खेळू शकतो असा मला विश्वास होता.”

“मी एकट्या चॅपेल यांना दोषी ठरवणार नाही. सुरूवात त्यांनी केली होती. त्यांनी क्रिकेट बोर्डाकडे माझ्याविरूद्धच्या तक्रारीची ई-मेल पाठवली होती. त्यातला मजकूर लीकदेखील झाला होता. क्रिकेट संघ हा कुटुंबाप्रमाणे असतो. त्यात मतभिन्नता, गैरसमज हे असतातच. पण ते सारं संवादाने सोडवायचं असतं. तुम्ही प्रशिक्षक आहात. तुम्हाला वाटतं की मी विशिष्ट प्रकारे खेळावं तर तुम्ही तसं मला येऊन सांगणं अपेक्षित आहे. मी संघात पुनरागमन केल्यावर त्यांनी मला हे सगळं सांगितलं, पण मग आधीच हे सारं का सांगितलं नाही?”, अशा शब्दात गांगुलीने त्याची नाराजीदेखील व्यक्त केली.